शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी खासदार बारणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Srirang-Barne.jpg)
पिपंरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पवना धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. तरी, पिंपरी-चिंचवडकरांना मुबलक पाणी मिळत नाही. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्याचे काम अद्याप सुरु नाही. तसेच, पिंपरी-चिंचवडकरांना अजूनही शास्तीकर भरावा लागत आहे. शहराचा सरसकट शास्तीकर माफ करावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिका प्रशासनासोबत बैठक घेण्याची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून बंद पाईपलाईनमधून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मंजुरी देखील मिळाली असून त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. हा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत काही गावांचा नव्याने समावेश धावा आहे.
शहर आणि समाविष्ट गावांची तहान केवळ पवना धरणातून येणा-या पाण्यावर भागणार नाही, यासाठी भामा आसखेड धरणातून 200 एमएलडी पाणी आणण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे काम देखील अद्याप सुरु झाले नाही, ही दुर्दैवी बाब आहे. शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनासोबत बैठक घेणे आवश्यक आहे. यामुळे शहराला भेडसावणारा पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लागेल. पूर्वीच्या सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा 1 हजार 500 चौरस फुटांपर्यंतचा शास्तीकर माफ केला आहे. आता हा शास्तीकर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.