आयुक्तांचा ‘हार्डकोअर’ झटका, कामचुकार 10 अधिका-यांवर कारवाईचा ‘आसूड’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिपंरी-चिंचवड शहरातील नागरिकांची सनद असलेल्या सारथी हेल्पलाईनद्वारे प्रशासनाकडे मांडलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे सह शहर अभियंता राजन पाटील, उपशहर अभियंता रामदास गणपतराव तांबे, प्रभारी सहशहर अभियंता श्रीकांत श्रीनिवास सवणे, सहा आयुक्त स्मिता झगडे, डॉ. अनिल रॉय यांच्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
अशा कामचोर आणि प्रशासकीय चालढकल करून लोकांच्या तक्रारी बासनात गुंडाळणा-या अधिका-यांची संख्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाढलेली आहे. एकाच विभागात दहा किंबहुना त्याहून अधिक वर्षांचा कार्यकाळ ठाण मांडलेल्या अधिका-यांची चमडी गेंड्याच्या कातडीपेक्षाही कठोर बनली आहे. त्यांच्यावर खासदार, आमदार, नगरसेवकांनी कितीही प्रहार केला तरी त्यांना फरक पडत नाही. आपले कोणी वाकडे करू शकत नाही, अशा अविर्भावात हे अधिकारी आपल्या विभागातील कनिष्टांवर फुशारकी मारत असतात. प्रलंबित तक्रारींबाबत वेळोवेळी कळवूनही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अशा अधिका-यांना समज देण्यापलीकडे काही केलेले नाही. शेवटी चौखोर टिका होऊ लागल्याने आयुक्तांनी शेवटी त्यांच्यातला ”हार्डकोअर” झटका दाखविला.
सारथीवरील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणा-या अधिका-यांमध्ये स्थापत्य/बांधकाम परवानगी/अ व ड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील, पाणी पुरवठा विभागाचे उपशहर अभियंता रामदास गणपतराव तांबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, पशुवैद्यकीय विभागाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. अरुण मारुती दगडे यांच्यावर रॉय वगळता 500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
डॉ. रॉय यांना 250 रुपयांचा दंड आकारला आहे. तसेच, कर संकलन विभागाच्या सहाआयुक्त स्मिता झगडे, प्र. आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण पांडुरंग गोफणे, प्र. कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, उपसंचालक राजेंद्र पवार, बीआरटीएस विभागाचे प्र. सह शहर अभियंता श्रीकांत श्रीनिवास सवणे, ड प्रभाग स्थापत्यचे कार्यकारी अभियंता देवन्ना नरसिल्लु गट्टुवार यांना 250 रुपयांचा दंड आकारला आहे. तक्रारींसंदर्भात आयुक्तांनी वेळोवेळी त्यांना समज दिला होता. तरीही, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.




