‘स्कॉर्पिओ’ला बांधून ‘एटीएम’ मशिन पळवली, चोरटे ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/atm-chori-Frame-copy.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
चाकणच्या म्हाळुंगे येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम थेट मोटारीच्या साहाय्याने पळवून नेल्याची घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. एटीएममध्ये ऐकूण ९ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणच्या म्हाळुंगे येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. त्या ठिकाणी अज्ञात तीन जणांच्या टोळक्याने लिफ्टसाठी वापरण्यात येणाऱ्या स्कॉर्पिओ मोटारीला केबलद्वारे एटीएम बांधून पळवून नेले आहे. भरधाव वेगात स्कॉर्पिओ मोटार पोलिसांच्या जवळून गेली, मात्र अशी काही घटना घडली असेल असे पोलिसांना वाटले नव्हते.
काही वेळानंतर एटीएम पळवून नेल्याचं पोलिसांना समजलं. तिघांपैकी दोघांनी एटीएम सेंटरमध्ये जाऊन सीसीटीव्हीवर स्प्रे मारलेला होता. एटीएम सेंटरवर असलेल्या सीसीटीव्हीत अज्ञात तिघेही कैद झालेत. चोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखा एकचे कर्मचारी, अधिकारी आणि म्हाळुंगे पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.