बलात्कारांबाबतच्या वक्तव्यावरून राहुल लक्ष्य
महाईन्यूज | नवी दिल्ली
लोकसभेत भाजप सदस्यांकडून गदारोळ, कामकाज तहकूब
झारखंड येथील निवडणूक प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बलात्कारांच्या घटनांबाबत मोदी सरकारवर टीका करताना ‘रेप इन इंडिया’ असा उल्लेख करून वक्तव्य केले. त्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी लोकसभेत उमटले. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी केली, तर राहुल यांच्यासारख्या नेत्यांना संसदेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले होते. भाजपच्या महिला खासदारांनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेऊन राहुल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला होता.
सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज दोनदा तहकूब करावे लागले आहे. त्यानंतर बिर्ला यांनी सभागृह संस्थगित होत असल्याचे जाहीर केले.सभागृहात गोंधळ सुरू असताना द्रमुकच्या खासदार कनिमोळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सरसावल्या, त्याचप्रमाणे काँग्रेसचे सदस्यही आसनांवरून उठले. राहुल गांधी यांनी सभागृहात शेरेबाजी केलेली नाही, त्यांनी देशात महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा संदर्भ दिला, असे कनिमोळी म्हणाल्या. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी, कनिमोळी यांचे मत दुर्दैवी असल्याचे सांगितले.