वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे नऊ पीएमपी थांबे हलवा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/pun02r.jpg)
- वाहतूक पोलिसांचा अहवाल पीएमपीला सादर
पुणे : शहरातील मध्यभागात तसेच प्रमुख रस्त्यांवर असलेले नऊ पीएमपी थांबे स्थलांतरित करण्याची सूचना वाहतूक पोलिसांकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) करण्यात आली आहे. शहरातील वर्दळीच्या चौकात आणि रस्त्यांवर असलेल्या नऊ थांब्यांमुळे कोंडीत भर पडत असल्याचे वाहतूक पोलिसांनी पीएमपीला दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
शहरातील वाहनांची वाढती संख्या, तसेच अरुंद रस्त्यांमुळे कोंडी होते. मध्यभागातील शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर पीएमपी थांबे आहेत. या रस्त्यांवरील पीएमपी थांब्यामुळे या भागात कोंडी होत असल्याचे दृश्य पाहायला मिळते. अरुंद रस्त्यांवर एकपाठोपाठ पीएमपी बस थांब्यावर थांबल्यानंतर वाहतूक विस्कळीत होते. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते. काही पीएमपी थांबे वर्दळीच्या चौकात आहेत. या थांब्यावर प्रवाशांची गर्दी असते. दररोज सकाळी आणि सायंकाळी या थांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. पीएमपी प्रशासनाने वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या पीएमपी थांब्यांची पाहणी करावी. काही थांबे वर्दळीच्या चौकापासून काही अंतरावर नेल्यास कोंडी सुटू शकते, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. काही थांब्याचे स्थलांतर करण्याचे देखील सुचविण्यात आले आहे.
चतु:शृंगी, औंध, कोंढवा, मुंढवा,कोरेगाव पार्क, बंडगार्डन रस्ता, हडपसर तसेच शिवाजी रस्त्यावरील थांबे स्थलांतरित करण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे. या थांब्याची पाहणी पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली असून त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही थांबे गर्दीच्या ठिकाणी आहेत. तेथील बसथांबे स्थलांतरित केल्यास प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, असे पीएमपी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. याबाबत पीएमपी प्रशासन वाहतूक पोलिसांना अहवाल सादर करणार आहेत.