…अन् बिग बींनी ‘केबीसी’त म्हटलं, ”शिष्टाचार नाही का तुम्हाला?”

‘कौन बनेगा करोडपती’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी तंवर आणि समाजसेवक श्यामसुंदर पालीवाल हॉटसीटवर बसले होते. या खेळादरम्यान एक अशी घटना घडली की बिग बी अचानक म्हणाले, “शिष्टाचार नाही का तुम्हाला?” ‘करमवीर विशेष’ भागात खेळ सुरू असताना पाच हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न ऐकून बिग बी वरमले. हा प्रश्न ऐकताच त्यांची प्रतिक्रिया “हे भगवान” अशी होती.
पाच हजार रुपयांसाठी हा प्रश्न होता, “गाण्याच्या या भागात कोणत्या प्रकारच्या पत्नीचा उल्लेख केला आहे?” यानंतर त्यांनी कम्प्युटरला गाणं ऐकवण्याची सूचना दिली आणि त्यासोबतच म्हटलं की, मला आता फार भीती वाटतेय. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या बिग बींच्या ‘लावारिस’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘मेरे अंगने मै’ यावेळी ‘केबीसी’त वाजवण्यात आलं होतं. “जिसकी बीवी लंबी उसका भी बडा नाम है”, ही गाण्याची ओळ ऐकून बिग बी वरमले आणि कम्प्युटरला म्हणाले, “मला लाज वाटेल असं वाटू नका. तुम्हाला शिष्टाचार नाही का?”





