PMC बँक : आणखी एका खातेदाराचा मृत्यू
पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आजारपणात रूग्णालयाचा खर्च करता आला नसल्यामुळे संबंधित खातेदाराचा मृत्यू ओढावला असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. अॅड्र्यू लोबो असं मृत व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, पीएमसी प्रकरणातील ही आठवी घटना आहे.
७४ वर्षीय अॅड्र्यू लोबो यांचं गुरूवारी ठाण्याजवळील काशेली येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती त्यांचा नातू क्रिस यानं दिली. काही दिवसांपूर्वीच बँकेतील घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले होते. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी एका खातेधारकानं आत्महत्या केली होती. त्यानंतर घडलेली ही आठवी घटना आहे. “अॅड्र्यू लोबो यांच्या खात्यात २६ लाखांची रक्कम जमा होती. त्यावरून मिळणाऱ्या व्याजावर त्यांचं घर चालत होतं. काही दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसाचा आजार झाला होता. त्यासाठी त्यांना नियमित औषधं आणि डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावं लागत होतं. परंतु त्यांच्याकडे असलेला पैसा बँकेत अडकल्यानं आवश्यक ती रक्कम त्यांना काढता येत नव्हती. त्यामुळे त्यांच्या उपचारात अडथळा निर्माण झाला,” असं क्रिस यांनी सांगितलं.
यापूर्वी पीएमसीच्या खातेधारक कुलदीप कौर यांचा मृत्यू झाला होता. पंजाब-महाराष्ट्र बँकेत हक्काचे पैसे विम्याच्या कामासाठी निघू शकत नसल्याने मागील काही दिवस कुलदीप कौर विग या अस्वस्थ होत्या. प्रसारमाध्यमांवरील बातम्यांमुळे त्यांना गुरुवारी अस्वस्थ वाटू लागलं. तो धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. कुलदीप कौर आणि त्यांच्या पतीच्या खात्यावर सुमारे १७ लाख रुपये जमा आहेत. काही दिवसांपासून विमा कंपनीचा हप्ता भरण्यासाठी कुलदीप आणि त्यांच्या कुटूंबीयांना दूरध्वनी आला होता. एक महिना शिल्लक असल्याने विग कुटुंबीयांनी विमा कंपनीच्या एंजटला पंजाब महाराष्ट्र बँकेचा धनादेश चालेल का, अशी विचारणा केली होती. मात्र अजून हा धनादेश चालणार नसल्याचे ध्यानात आल्यावर विग कुटुंबीय अस्वस्थ झाले होते.