breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

समाजमाध्यमातील अफवांविरोधात ‘एनकेजीएसबी’ची पोलिसांत वर्दी

बहुराज्यात शाखाविस्तार असलेल्या आणि तब्बल १०२ वर्षांचा वारसा लाभलेल्या सहकार क्षेत्रातील एनकेजीएसबी बँकेने समाजमाध्यमावरील ‘बँक बंद होणार असल्या’च्या पसरविण्यात येत असलेल्या अफवांची गंभीर दखल घेऊन, या खोडसाळपणाविरुद्ध कारवाईसाठी पोलिसात वर्दी दिली आहे.

एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विरोधात शनिवारी समाजमाध्यमांवर दुष्ट हेतूने आणि निराधार मजकूर फैलावण्यात येत असल्याचे बँकेच्या लक्षात आले. तथापि हा अत्यंत खोडसाळ व तथ्यहीन प्रचार असून, अत्यंत व्यावसायिकरीत्या चालविल्या जात असलेल्या, भक्कम आर्थिक पाया असलेल्या बँकेबद्दलच्या या दुष्प्रचाराला सभासद आणि खातेदारांनी बळी पडू नये, अशी प्रतिक्रिया एनकेजीएसबीचे व्यवस्थापकीय संचालक चिंतामणी नाडकर्णी यांनी व्यक्त केली. अशा आशयाचे आवाहन करणारे आणि भीतीचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्ट करणारे लघुसंदेश बँकेकडून शनिवारी सर्व खातेदारांनाही मोबाइल फोनवर पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व प्रकाराची बँकेने गंभीर दखल घेतली असून, मत्सरी हेतूने होत असलेल्या या दुष्प्रचाराचा बंदोबस्त करण्यासाठी सोमवारी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडेही रीतसर तक्रार दाखल केली जाणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button