सात्त्विक-चिराग जोडीची अव्वल १० स्थानांमध्ये पुन्हा मजल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/l-10.jpg)
सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या पुरुष दुहेरीतील जोडीने जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या क्रमवारीत अव्वल १० स्थानांमध्ये पुन्हा मजल मारली आहे.
सात्त्विक आणि चिरागने रविवारी फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे उपविजेतेपद पटकावले. ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ७५०’ दर्जाच्या स्पध्रेची अंतिम फेरी गाठणारी सात्त्विक-चिराग ही पहिली जोडी ठरली. या जोडीने दोन स्थानांनी आगेकूच करीत क्रमवारीत नववे स्थान गाठले आहे.
सात्त्विक-चिरागने गतवर्षी ऑगस्टमध्ये ‘बीडब्ल्यूएफ सुपर टून ५००’ दर्जाच्या थायलंड खुल्या स्पध्रेचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावताना अव्वल १० स्थानांवर मजल मारली होती. गेल्या आठवडय़ात या जोडीने विश्वविजेत्या मोहम्मद एहसान व हेंड्रा सेटिआवान जोडीला नामोहरम केले होते.
महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल अनुक्रमे सहाव्या आणि नवव्या स्थानावर कायम आहेत. फ्रेंच खुल्या स्पध्रेत या दोघींना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली होती.
सध्या सारलॉरलक्स खुल्या स्पध्रेत खेळणारा उदयोन्मुख खेळाडू लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या क्रमवारीत एका स्थानाने आगेकूच करीत ५१वे स्थान गाठले आहे, तर शुभंकर डे याने चार स्थानांनी सुधारणा करीत ३८वे स्थान प्राप्त केले आहे. पारुपल्ली कश्यप आणि समीर वर्मा या दोघांनी एकेक स्थानांनी सुधारणा करीत अनुक्रमे २५वे आणि १७वे स्थान मिळवले आहे.
महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांची दोन स्थानांनी घसरण झाली असून, त्या २६व्या स्थानावर आहेत.