‘स्वतःच्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा आधिक आनंद’ – आमदार जितेंद्र आव्हाड
पुणे | महाईन्यूज
साताऱ्यामध्ये लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार झटका दिला आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. यावर पहिली प्रतिक्रिया देताना कळवा-मुंब्रा मतदार संघातून विजयी झालेलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी “स्वत:च्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा आनंद अधिक” असल्याचे म्हटले आहे.
“लोकांनी उदयनराजेंना जो धडा शिकवला आहे तो महत्वाचा आहे. मला माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचाच अधिक आनंद झाला आहे. उदयनराजेंनी शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्यानंतर त्यांना लोकांनी धडा शिकवला आहे,” असं मत आव्हाडांनी विजयानंतर व्यक्त केलं आहे. तसेच “दहा वर्षांपूर्वी शरद पवारांनी संपूर्ण जिल्ह्याचा विरोध पत्कारुन उदयनराजेंना उमेदवारी दिली होती. आम्ही महाराजांच्या विचारांवर चालतो, महाराजांनी आम्हाला कधी गद्दारी शिकवली नव्हती,” असं मतही आव्हाडांनी व्यक्त केलं आहे.
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या खासदारकीचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीआधीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांनी दूर्लक्ष केल्याने पक्षाला गळती लागल्याचा आरोप केला होता.