भारत-पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत अमेरिकेला चिंता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/american-flag.jpg)
- अमेरिकी काँग्रेसमध्ये दलित, मुस्लिमांवरील हल्ल्यांबाबत चर्चा
वॉशिंग्टन : भारतात अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचार व पक्षपाताच्या घटना होत असून दलित व मुस्लिमांवर गोरक्षकांनी हल्ले केले आहेत. त्यातून अल्पसंख्याकांना कायद्याने दिलेल्या संरक्षणाची पायमल्ली झाली आहे, अशी टीका अमेरिकेच्या दक्षिण व मध्य आशिया विभागाच्या हंगामी सहायक परराष्ट्रमंत्री अलाइस जी वेल्स यांनी अमेरिकी काँग्रेसच्या उपसमितीपुढे बोलताना केली.
परराष्ट्र कामकाज व अण्वस्त्रप्रसारबंदी, आशिया, पॅसिफिक कामकाज समितीपुढे त्यांनी सांगितले, की भारतात अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचार वाढला आहे. दलित व मुस्लिमांवर गोरक्षक हल्ले करीत आहेत. नऊ राज्यांत जे धर्मातरविरोधी कायदे करण्यात आले आहेत, ते अल्पसंख्याकांना देण्यात आलेल्या कायदेशीर संरक्षणाचे पालन करणारे नाहीत. अमेरिकेने भारत सरकारला धार्मिक स्वातंत्र्याच्या वैश्विक अधिकाराचे पालन करण्यास सांगितले आहे पण प्रत्यक्षात धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. आसाममध्ये १९ लाख लोकांना नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित करून बेदखल केले आहे. भारताने अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचार करणाऱ्यांना शिक्षा केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, असे वेल्स म्हणाल्या.
- संसदीय लोकशाहीचे कौतुक
काही मुद्दय़ांवर त्यांनी प्रशंसा करताना म्हटले आहे की, गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतात सर्व धर्म, जाती, पंथ व वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पाश्र्वभूमीच्या ६८ टक्के पात्र मतदारांनी मतदान केले, त्यात संसदीय लोकशाहीचे परिणामकारक दर्शन घडले. या निवडणुकात महिलांनी मोठय़ा संख्येने मतदान केले ही बाब मात्र कौतुकास्पद आहे. भारतातील नागरी समुदाय व लोकशाही संस्थांनी अनेक आव्हानांना ठोसपणे तोंड दिले आहे. भारताची लोकसंख्या व आकार बघता न्यायालये व पोलीस यांना अपुऱ्या मनुष्यबळात काम करणे अवघड असतानाही त्यांनी यथाशक्ती काम करून आव्हाने पेलली आहेत. स्थानिक प्रशासनांपुढे अनेक समस्या असताना त्यांनी त्यांचे अग्रक्रम ठरवून त्यात सुधारणा केल्या आहेत. भारत ही हिंदू, जैन, शीख व बौद्ध या चार धर्माची जन्मभूमी आहे. जगात मुस्लीम लोकसंख्येत भारताचा तिसरा क्रमांक आहे. सुफी, शिया, बोहरा मुस्लीम येथे आहेत. भारतात तीन टक्के लोक ख्रिश्चन आहेत. २९ पैकी तीन राज्यांत ख्रिश्चन हे बहुसंख्याक आहेत. यहुदी धर्माचा मोठा इतिहास भारताकडे आहे. देशातील सर्वात जुनी अग्यारी १५६८ मधील आहे. तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना भारताने दिलेला पाठिंबा कौतुकास्पद आहे. प्रादेशिक व भाषिक विविधताही भारतात विपुल आहे.