भीमा-कोरेगाव प्रकरण : न्यायालयाने विचारवंतांचा जामीन अर्ज फेटाळला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/mumbai-high-court.jpg)
मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही विचारवंताच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने तिन्ही विचारवंताचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मानवी व नागरी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि लेखक वेर्नन गोन्साल्विस हे गेल्या वर्षभरापासून भीमा कोरेगाव प्रकरणी जेलमध्ये आहेत. पुण्यातील भीमा-कोरेगाव आणि शहरी नक्षलवादासंदर्भात पुणे पोलिसांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येत होती. मात्र न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल या तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. भीमा- कोरेगाव हिंसाचारामागे नक्षवाद्याचा हात असून मानवी-नागरी हक्क कार्यकर्त्यांचा संबंध असून ते या हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला होता. याप्रकरणी तिघांविरोधात पुणे पोलिसांनी एफआयआयर सुध्दा दाखल केली होती.
दरम्यान, या तिन्ही विचारवंतांना वर्षभरापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे त्यांनी मुंबई न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाकडून देखील त्यांना दिलासा मिळाला नाही. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील संबंधित आरोपींच्या घरातून जप्त करण्यात आलेली पत्रे, ईमेलमधील तपशील आणि कॉल रेकॉर्डवरुन या तिघांचा या कटाशी संबंध असल्याचे स्पष्ट असल्याने त्यांना जामीन देऊ नये अशी विनंती पुणे पोलिसांनी केली होती.