“नवरा-बायको असल्यासारखं वाटतंय”; पाकिस्तानच्या फिरकीपटूची ‘गुगली’
सध्या पाकिस्तानचा संघ श्रीलंकेविरूद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेत पाकिस्तानच्या संघात फिरकीपटू शादाब खान याला संधी देण्यात आली आहे. पण वेगवान गोलंदाज हसन अलीला वगळण्यात आले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे प्रथमच एखाद्या मालिकेत शादाब खान हा हसन अलीशिवाय खेळणार आहे. याबाबत एका पत्रकार परिषदेत शादाब खानला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शादाब खानने दिलेले उत्तरामुळे पत्रकारांमध्ये प्रचंड हशा पिकला.
पत्रकार परिषद सुरू असताना पत्रकाराने शादाब खानला विचारले की हसन अली नसलेली अशी पहिलीच मालिका तू खेळणार आहेस. याबाबत तुझ्या मनात काय भावना आहेत? या प्रश्नावर शादाब खान म्हणाला की तो आणि मी सगळ्या मालिका एकत्र खेळलो आहोत. त्यामुळे आता तुमच्या प्रश्नामुळे मला आम्ही दोघे नवरा-बायको असल्याची भावना येत आहे. त्याच्या मिश्कील उत्तराने पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
शादाब खानने स्वत: हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यावर चाहत्यांनी त्याच्या उत्तराची स्तुती केली.
दरम्यान, त्यानंतर बोलताना तो म्हणाला की आम्ही दोघे अतिशय चांगले मित्र आहोत. मला नक्कीच त्याची उणीव भासेल. तो संघासाठी दीर्घकाळ खेळतो आहे. त्यामुळे केवळ मीच नव्हे तर संपूर्ण संघाला त्याची उणीव भासेल, असे तो म्हणाला. “तो अतिशय उत्साही खेळाडू आहे. ड्रेसिंग रूममध्ये असतानाही तो कायम मजा मस्करी करत असतो. त्यामुळे ड्रेसिंग रूमचे वातावरण ताजंतवानं राहतं. त्याच्या असण्याने ड्रेसिंग रूममध्ये नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच त्याची आम्हा साऱ्यांना मालिकेदरम्यान खूप आठवण येईल”, असेही तो म्हणाला.