‘राज ठाकरेंनी सोडले मौन’, 5 तारखेला राजकीय फटाके फुटणार
![Big blow to MNS, resignation of 320 office bearers at a time](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/raj-thackeray1-1-1.jpg)
ईडीच्या चौकशीनंतर मौन धारण केलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीत नेमकी भूमिका काय याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे. त्यातच आता ठाकरे यांनी हे मौन सोडले असून आजवर जे बोललो नाही, ते आता बोलणार आहे. येत्या पाच तारखेला आपली पहिली प्रचार सभा होणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांचा मनसेत प्रवेश झाला. यानिमित्त पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र पाटील हे पक्षातर्फे निवडणूक लढतील, असेही त्यांनी सांगितले. शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील हे त्यांचे पुत्र आहेत. नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी देखील मनसेत प्रवेश केला.
कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने चौकशी केल्यानंतर राज ठाकरे शांत झाले होते. राज ठाकरेंनी मौन बाळगल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनीही राज ठाकरे ईडीच्या चौकशीनंतर शांत झाल्याचं म्हटलं होतं. पण अखेर राज ठाकरेंनी आज मौन सोडलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचं सांगितलं. पाच तारखेला आपली पहिली प्रचारसभा पार पडणार असून इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत असंही त्यांनी यावेळी म्हटलं. विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.