ईडीकडून शरद पवारांना विनंती, तोपर्यंत चौकशीसाठी येऊ नये’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/NCP-chief-and-former-union-minister-Sharad-Pawar-770x435.jpg)
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. मात्र शरद पवार यांची जेव्हा चौकशी करायची असेल तेव्हा त्यांना समन्स बजावण्यात येईल. त्यामुळे जोपर्यंत चौकशीसाठी बोलावण्यात येत नाही तोपर्यंत येऊ नये, अशी विनंती ईडीने शरद पवार यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शरद पवार मात्र ईडी कार्यालयात जाण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे दुपारी 2 वाजता ते ईडीच्या कार्यालयात जातील. या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरात 144 कलाम लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन
‘ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी,’ असं आवाहन शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.