पुण्यातील प्रसिध्द ‘येवलें’ चहा कंपनीवर एफडीएची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/20800128_521844598165244_3767866327912178963_n-1.jpg)
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
पुण्यातील ‘येवले अमृततुल्य चहा’विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत ( एफडीए) कारवाई करण्यात आली आहे. या चहामध्ये मेलानाईटचा भरपूर प्रमाणात वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर पुण्यातील अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री इम्रान हवालदार आणि रमाकांत कुलकर्णी यांनी येवला फुड प्रॉडक्ट गोडाऊनमधील विक्रीसाठी पॅकबंद करून ठेवलेला चहा पावडर, साखर, टी मसाला यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. शिवाय यासंदर्भात प्रेस नोटदेखील जारी करण्यात आली आहे.
तसेच सुमारे 6 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या उत्पादनांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत आवश्यक असणारी माहिती छापणं बंधनकारक आहे. पण जप्त केलेल्या पाकिटांवर कोणत्याही प्रकारचे लेबल आढळले नाही. त्यामुळे त्यात नेमका कोणता अन्न पदार्थ आहे, त्यात निश्चित कोणता घटक पदार्थ किती प्रमाणात आहेत याबाबतीची कोणतीही माहिती सर्वसामान्यांना देण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबत खातरजमा होण्यासाठी प्रयोगशाळेकडून तपासणीही केलेली नाही. शिवाय, येवले फुड प्रॉडक्टकडे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत आवश्यक असलेला परवानादेखील नसल्याचं तपासात चौकशीत समोर आलं आहे.