प्रेयसीचा साखरपुडा झाल्याने तुटलं ह्रदय, फेसबुक लाइव्ह करत तरुणाची मंदिरात आत्महत्या

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे तरुणाने मंदिरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेयसीचा दुसऱ्यासोबत साखरपुडा झाल्याने तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचललं. धक्कादायक म्हणजे तरुणाने आत्महत्येचं फेसबुकवर लाइव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. २२ वर्षीय श्याम सिकंदर उर्फ राज रायभा येथील मंदिरात गेला आणि तेथे गळफास लावून आत्महत्या केली.
श्याम सिकंदर याने आत्महत्येचं फेसबुक लाइव्ह केलं तेव्हा त्याचे अनेक मित्र पाहत होते. महत्त्वाचं म्हणजे त्यांने आपल्या अनेक ओळखीच्या लोकांना आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं होतं. चार मिनिटांच्या फेसबुक लाइव्हदरम्यान श्याम याने पोलिसांना आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नका असं सांगितलं आहे. यावेळी त्याने आपल्या मृतदेहाचे फोटो ऑनलाइन अपलोड करा अशी विनंतीही कुटुंबीयांना केली.
या व्हिडीओ व्यतिरिक्त श्यामने चार पानांची सुसाईड नोटही लिहिली होती. यामध्ये त्याने आपल्या कुटुंबीयांची माफी मागितली असून आपले अवयवदान करावते अशी विनंती केली.
“मला तिची आठवण येते आणि तिच्याशिवाय राहू शकत नाही. ती दुसऱ्यासोबत लग्न करतीये ही गोष्ट मी सहनच करु शकत नाही. मी तिला गमावलं आहे याचा मला प्रचंड त्रास होत असून, माझी नोकरीही गमावली आहे”, असं श्यामने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. श्याम गुडगांवमधील एका फॅक्टरीत काम करायचा. पण ही नोकरी त्याने काही दिवसांपूर्वी गमावली होती.
स्थानिकांना मृतदेह मंदिरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी व्हिडीओ काढून टाकला असून श्यामचं फेसबुक अकाऊंटही बंद केली आहे.




