केस केल्याबद्दल राहुल गांधींनी मानले संघ, भाजपाचे आभार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Rahul-Gandhi-7.jpg)
राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आभार मानले आहे. आपल्या विरोधात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खटला दाखल केला आहे. मी त्यांचे संधी दिल्याबद्दल आभार मानतो, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
आज मी अहमदाबादमध्ये आहे. माझ्या विरोधात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खटला दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात असलेली माझी वैचारिक लढाई जनतेसमोर आणण्यासाठी त्यांनी दिलेल्या व्यासपीठासाठी आणि संधीसाठी त्यांचे आभार मानतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. मुंबई आणि पाटण्यानंतर राहुल गांधी यांनी शुक्रवारी अहमदाबादमधील स्थानिक न्यायलयात हजेरी लावली. नोटबंदीदरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून अहमदाबादमधील न्यायालयात त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे.
न्यायालाने राहुल गांधी यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. नोटबंदीदरम्यान, राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेवर 745 कोटी रूपयांचे काळे धन पांढरे केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बँक आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. दरम्यान, न्यायालयाने त्यांना 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला आहे. याप्रकरणी यापूर्वी एप्रिलमध्ये सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने राहुल यांना 27 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी न्यायालयाकडे वेळ मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची मागणी स्वीकारत 12 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेश दिले होते.