राज्यात ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; घाटात पर्यटनासाठी न जाण्याचा सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/anupam-kashyapi.jpg)
मुंबई, उपनगर तसेच पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता पुणे येथील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पावसाचा जोर लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी या काळात पर्यटनस्थळांवर जाऊ नये असे आवाहनही पुणे हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी केले आहे.
कश्यपी यांनी सांगितले की, राज्याची सध्याची स्थिती अशी बनली आहे की, कालच्या तुलनेत पावसाची क्षमता आज वाढली आहे. दक्षिण-मध्य भारत, ओडिशा, झारखंड येथून मान्सून विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत मान्सूनचा जोर वाढणार आहे. खासकरुन उत्तर महाराष्ट्रात त्याचा मोठा प्रभाव जाणवेल. तसेच कोकण आणि गोव्यात पुढच्या पाच दिवसांत बहुतांश भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर एखाद-दोन ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३ जुलैला सर्वदूर पाऊस पडेल. ४ जुलैच्या दुपारनंतर पाऊस कमी होताना दिसेल. ६ जुलैला उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून हा पाऊस विखुरलेल्या स्थितीत कोसळेल. मात्र, उत्तर महाराष्ट्रात या दिवशी जोरदार पाऊस होईल. त्यामुळे पर्यटकांनी एक्स्प्रेस वे, घाटमाथा या भागात न जाण्याचा इशारा देण्यात येत आहे, असे कश्यपी यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यात साधारण पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. येत्या चोवीस तासात पुण्यात १.६ ते ६.४ सेमी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे.