स्विस बँकांतील निधीत भारत ७४ व्या क्रमांकावर

- जगभरातून ठेवल्या जाणाऱ्या निधीमध्ये ४ टक्के घसरण
स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती स्विस नॅशनल बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तेथे गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारताचा ७४ वा क्रमांक लागला असून ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे स्थान एक अंकाने घसरले आहे.
काळा पैसा ठेवणाऱ्यांसाठी स्वित्झर्लंड हे नंदनवनच मानले जाते.अर्थात ही आकडेवारी अधिकृत असल्याने यात काळ्या पैशाचा अचूक अंदाज येत नाही. शिवाय या आकडेवारीत अनिवासी भारतीय, भारतीय यांनी त्यांच्या परदेशातील संस्थांच्या नावाने ठेवलेला पैसा समाविष्ट नाही. २०१८ मध्ये जगातून स्विस बँकांत ठेवण्यात आलेला निधी ९९ लाख कोटींनी कमी झाला असून ही घसरण ४ टक्के आहे. भारतीय संस्था व व्यक्ती यांनी स्विस बँकात ठेवलेला निधी ६ टक्क्य़ांनी कमी होऊन २०१८ मध्ये ६७५७ कोटी रूपयांवर आला आहे. गेल्या दोन दशकातील ही नीचांकी पातळी आहे.
स्विस बँकेत अनेक देशातील संस्था व नागरिकांचा काळा पैसा ठेवलेला आहे. गेल्या वर्षी भारताचा ७३ वा क्रमांक लागला होता. वर्षभरापूर्वी भारताचा ८८ वा क्रमांक होता पण त्यानंतर तो ७३ पर्यंत आला. भारतीय व्यक्ती व संस्थांचा स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारत खालच्या स्थानावर आहे.स्वित्झर्लंडमध्ये गुंतवण्यात आलेल्या एकूण सर्व देशांच्या पैशाचा विचार करता त्यात भारतीय व्यक्ती व संस्था यांचा पैसा केवळ ०.०७ टक्के आहे. ब्रिटन यात पहिल्या क्रमांकावर असून २०१८ अखेरीस तेथील व्यक्ती व संस्था यांचा जास्तीत जास्त निधी स्विस बँकात आहे. स्विस बँकांतील एकूण परदेशी निधीत ब्रिटनचा वाटा २६ टक्के आहे. त्यानंतर अमेरिका, वेस्ट इंडिज, फ्रान्स, हाँगकाँग यांचा क्रमांक पहिल्या पाचात आहे. स्विस बँकांतील पन्नास टक्के पैसा या पाच देशांचा आहे. पहिल्या दहा देशांचा या गुंतवणुकीतील वाटा दोन तृतीयांश आहे. पहिल्या पंधरा देशांचा वाटा ७५ टक्के, तर पहिल्या तीस देशांचा वाटा ९० टक्के आहे.
कुणाचा क्रमांक कितवा?
स्विस बँकेत जास्तच पैसा असलेल्या देशांमध्ये ब्रिटन पहिल्या क्रमांकावर, तर पहिल्या दहात बहामाज, जर्मनी, लक्झेमबर्ग, केमन बेटे, सिंगापूर यांचाही समावेश आहे. ब्रिक्स देशात रशियाचा क्रमांक विसावा असून चीन २२ वा, तर दक्षिण आफ्रिका ६० वा, ब्राझील ६५ वा आहे. मॉरिशस (७१), न्यूझीलंड (५९), फिलिपिन्स (५४), व्हेनेझुएला (५३), सेचेलिस (५२), थायलंड (३९), कॅनडा (३६), तुर्की (३०), इस्रायल (२८), सौदी अरेबिया (२१), पनामा (१८), जपान (१६), इटली (१५), ऑस्ट्रेलिया (१३), संयुक्त अरब अमिरात (१२), गर्नसे (११) या प्रमाणे क्रमवारी आहे. भारताच्या शेजारील देश खालच्या स्थानावर असून त्यात पाकिस्तान (८२), बांगलादेश (८९), नेपाळ (१०९), श्रीलंका (१४१), म्यानमार १८७), भूतान (१९३) याप्रमाणे क्रमवारी आहे. स्विस बँकांतील पाकिस्तानी लोक व संस्थांचा पैसा प्रथमच भारतापेक्षा कमी झाला आहे.





