TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

कस्तुरबा रुग्णालयात गोवरबाधित ६१ मुले, सहा कृत्रिम प्राणवायूवर

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत गोवर रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत १२६ गोवरचे रुग्ण आढळून आले असून ९०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६१ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सहा रुग्ण कृत्रिम प्राणवायूवर ठेवण्यात आले आहे. या मुलांसाठी रुग्णालयात ३ कक्ष उभारण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईमध्ये एम पूर्व म्हणजेच गोवंडी विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासून गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून दोन महिन्यांत ९९ रुग्णांची नोंद झाली आहे. एम पूर्व गोवंडी विभागात एकूण १ लाख १४ हजार १५७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये १,२६१ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर मुंबईत १० लाख ९२ हजार ३९१ घरांचे सव्‍‌र्हेक्षण करण्यात आले आहे.

मुंबईत जानेवारीपासून आतापर्यंत एकूण १२६ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत अतिरिक्त सत्रात ५९७२ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या विभागात केंद्र सरकारने नियुक्त केलेले  तीन सदस्यीय पथकात विभागवार भेट देत आहे. या टीमने तीन संशयित मृत्यूनंतर शवविच्छेदन केलेल्या राजावाडी रुग्णालयाला भेट दिली आहे.

एकूण ९०८ रुग्ण 

० ते ८ महिन्यांचे ९९, ९ ते ११ महिने १०५, १ ते ४ वर्ष ४९३, ५ ते ९ वर्षे १६२, १० ते १४ वर्षे ४४, १५ आणि त्यावरील सहा असे एकूण ९०८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी कस्तुरबा रुग्णालयात ६१ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यात ० ते ८ महिन्यांचे ८, ९ ते ११ महिने ५, १ ते ४ वर्ष ३१, ५ ते ९ वर्षे १४, १५ आणि त्यावरील तीन रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या ६१ रुग्णांपैकी सहा रुग्ण कृत्रिम प्राणवायूवर आहेत.

  केंद्रीय पथकाकडून सूचना

केंद्रीय पथकाने सोमवारी राज्य शासनाच्या प्रमुख सचिवांना तसेच अतिरिक्त आयुक्त (प. उ.) यांना मुंबईतील गोवर उद्रेकाच्या सद्य परिस्थितीबाबत माहिती देऊन सूचना दिल्या आहेत. त्यात उद्रेक असलेल्या विभागात सर्वेक्षणाद्वारे दररोज ताप व पुरळ असलेल्या नवीन रुग्णांचा शोध घेणे, लक्षण आढळलेल्या रुग्णांचा दुसऱ्या दिवशी पाठपुरावा करणे, अतिरिक्त लसीकरण सत्राचे आयोजन करणे, रुग्ण दाखल करण्याची सुविधा वाढविणे. आरोग्य सेविकांना गोवर आजाराच्या गंभीर लक्षणांबाबत अवगत करणे. खाजगी डॉक्टरांना गोवर आजार व लसीकरणाविषयी अवगत करणे, लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे अशा सूचना दिल्या आहेत. केंद्रीय पथक सदर अहवाल शासनाकडे सादर करणार आहे.

‘कचराभूमी, जैववैद्यकीय कंपनीमुळे गोवंडीमध्ये गोवरचा उद्रेक’

गोवंडी भागामध्ये गोवरचे सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने पालिकेने गोवंडीमध्ये विशेष लक्ष पुरविले आहे. मात्र गोवंडीमध्ये गोवर या आजाराचा उद्रेक होण्यामागे कचराभूमी आणि जैववैद्यकीय कंपनीतून बाहेर पडणारे रासायनिक घटक असल्याचा दावा करून शिवाजी नगरमधील एका रहिवाशाने थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाच नोटीस पाठविली आहे. फैयाज आलम शेख हे न्यू संगम वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गोवंडी परिसरात जैववैद्यकीय प्रकल्प असल्याने मागील दोन वर्षांपासून गोवंडीच्या झोपडपट्टीतील नागरिक अनेक आरोग्य समस्यांचा सामना करत आहेत. त्यातच आता गोवर या आजाराचा गोवंडीमध्ये उद्रेक झाला आहे. गोवंडीमध्ये असलेल्या कचराभूमीवर संपूर्ण शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे येथील वातावरण प्रदूषित झालेले आहे. त्यातच कचराभूमीपासून १५० मीटर अंतरावर आणखी एक जैववैद्यकीय प्रकल्प आहे. यातून बाहेर पडणारा धूर हा प्रचंड घातक आहे. त्यामुळे शेख यांनी पवार यांना नोटीस पाठवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button