TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

यशवंतरावांचे विचार आणि अजितदादांचा विकासवारसा पुढे नेणार! : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

कराडच्या प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याची ग्वाही

कराड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपलेली विकासाची कार्यपरंपरा पुढे नेत महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रांत प्रगतिपथावर नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिली.

माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी सुनेत्रा पवार यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, नगराध्यक्ष राजेंद्र यादव आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. “यशवंतराव चव्हाण यांनी देशाला सहकार आणि सर्वसमावेशक विकासाचा मंत्र दिला. प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांचे हित केंद्रस्थानी ठेवणाऱ्या त्यांच्या विचारांतूनच राज्याची जडणघडण झाली. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा यशवंतरावांनी जपला. त्याच विचारांचा ठसा अजितदादांच्या कार्यपद्धतीतही कायम उमटला,” असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा –  राज ठाकरे दोन दिवस कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर; मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर भर!

अजित पवार यांच्या निधनानंतरची यशवंतराव चव्हाण यांची ही पहिलीच पुण्यतिथी असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत प्रीतिसंगमावर येताना मन दाटून आल्याची भावनाही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. यशवंतरावांच्या विचारांतून प्रेरणा घेत अजितदादांनी राज्याच्या विकासकामांना गती दिली. त्यांच्या पश्चात हा विकासविचार आणि कर्तृत्वाचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

अजितदादांची प्रीतिसंगमावर येण्याची परंपरा

यशवंतराव चव्हाण यांची जयंती असो वा पुण्यतिथी, प्रीतिसंगमावर येऊन अभिवादन करण्याचा अजित पवार यांचा नियमित शिरस्ता होता. चव्हाण यांच्या विचारांबद्दल त्यांना नितांत आदर होता. मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये यशवंतरावांची लोककल्याणाची दृष्टी महत्त्वाची असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. अजितदादांच्या जाण्याने ही परंपरा खंडित होऊ न देता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्याचा विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सहकारातून समृद्धीचा विचार पुढे नेणार

यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अजित पवार यांनीही सहकार क्षेत्राला महत्त्व दिले. सहकार आणि विकासनीतीचा हाच विचार पुढे नेत महाराष्ट्राच्या विकासाची वाट अधिक सक्षम करण्याचा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group