Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘अक्वान’ चक्रीवादळ आज दुपारी ओडिशा-आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार! ३ लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर अन् ४१८ बचाव पथके तैनात

Cyclone Akvan | गेल्या दीड महिन्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तिसरे चक्रीवादळ ‘अक्वान’ (Cyclone Akvan) आज (२० नोव्हेंबर) दुपारपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर म्हणजेच ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील गोपाळपूरजवळ धडकण्याची दाट शक्यता आहे. ‘अर्णब’ आणि ‘मुरसू’ या चक्रीवादळांनंतर निर्माण झालेले हे वादळ गुरुवारी रात्री अधिक शक्तिशाली झाले असून, या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ‘अक्वान’ चक्रीवादळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातून ताशी १९ किमी वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे. गुरुवारी रात्री ११:३० वाजता हे वादळ आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून आग्नेयेकडे १७० किमी, विशाखापट्टणमपासून २०० किमी आणि ओडिशातील गोपाळपूरपासून दक्षिणेकडे २४० किमी अंतरावर होते. आज दुपारी हे वादळ किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किमी, तर काही ठिकाणी ताशी ९० किमीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

३ लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर

चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी भुवनेश्वरमधील विशेष मदत आयुक्त कार्यालयात आपत्कालीन आढावा बैठक घेतली असून, राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करून असुरक्षित भागांतील ३ लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे; तसेच राज्यात ९,३४१ चक्रीवादळ निवारा केंद्रे सज्ज ठेवण्यात आली असून बचावकार्यासाठी एनडीआरएफ (NDRF), डिझास्टर रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स आणि अग्निशमन दलाची एकूण ४१८ प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत आणि किनारपट्टीसह मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या डोंगराळ भागांवरही प्रशासन विशेष लक्ष ठेवून असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे ‘अक्वान’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, असे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘अक्वान’ हे नाव कसे पडले?

उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांच्या अधिकृत नामकरण यादीत इराणने सुचवलेल्या नावांपैकी ‘अक्वान’ हे एक नाव आहे. या नावाचा संबंध पर्शियन पौराणिक कथा आणि साहित्याशी आहे. प्रसिद्ध पर्शियन कवी फिरदौसी यांच्या ‘शाहनामा’ या महाकाव्यात ‘अक्वान-ए-दिव’ (Akvan-e Div) नावाच्या एका राक्षसाचे पात्र येते, ज्याचा वध पर्शियन महानायक रुस्तम करतो. चक्रीवादळ हे राक्षसासारखेच विध्वंसक काम करत असल्याने इराणने या वादळाला ‘अक्वान’ हे नाव दिले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group