Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री भरत गोगावले यांचे निर्देश

प्रलंबित योजनांसाठी कालमर्यादा निश्चित करण्याचे आदेश; निकृष्ट कामांवर कारवाईचा इशारा, पूर्ण योजनांतील पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यावर भर

रायगड-अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नियमित, पुरेशा दाबाने आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. प्रलंबित कामांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.

जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कागदोपत्री पूर्ततेपेक्षा प्रत्यक्ष पाणीपुरवठ्यावर भर

जलजीवन मिशन ही केंद्र आणि राज्य शासनाची ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई प्रतिदिन ५५ लिटर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील महिलांचे पाण्यासाठी होणारे कष्ट कमी करणे आणि प्रत्येक गावाला नियमित पाणीपुरवठा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

योजनेची कामे केवळ कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखविण्याऐवजी संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या कामांची गुणवत्ता, प्रत्यक्ष अंमलबजावणी, निर्धारित वेळेत पूर्तता आणि नागरिकांना नियमित पाणी मिळते की नाही, याची वस्तुस्थिती तपासणे गरजेचे आहे. प्रलंबित कामांमधील अडचणी दूर करून प्रत्येक गावापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवावा, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी पहाटे ३:३० वाजता सुरू होणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

दिरंगाई आणि निकृष्ट कामांवर कारवाईचा इशारा

कामांमध्ये दिरंगाई, निकृष्ट दर्जा किंवा निष्काळजीपणा आढळल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. प्रत्येक प्रलंबित कामासाठी कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार प्रगती साधावी. अधिकारी आणि ठेकेदारांनी जबाबदारीने काम करून ग्रामीण कुटुंबांना नियमित, पुरेसा आणि गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत तालुकानिहाय पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. पूर्ण झालेल्या काही योजनांमध्ये वाढीव साठवण टाक्या, जलशुद्धीकरण प्रकल्प, पाइपलाइन आणि वीजजोडणीची आवश्यकता असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कामे स्थगित ठेवण्याची शक्यता

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता २५ टक्क्यांपर्यंत काम झालेल्या काही योजनांची कामे तात्पुरती स्थगित ठेवण्याबाबत शासन स्तरावर चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असे पालकमंत्री गोगावले यांनी सांगितले.

ग्रामस्थांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

धरणे आणि नद्यांमधील गाळ काढण्यावर भर

जिल्ह्यातील काही ठिकाणी धरणांमधील तसेच नद्यांमधील गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. पाणीसाठवण क्षमता वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. मागणीनुसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात येतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ठेकेदारांची प्रलंबित देयके निधी मिळाल्यानंतर अदा करणार

जलजीवन मिशनअंतर्गत कामे पूर्ण केलेल्या काही ठेकेदारांची देयके प्रलंबित असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group