TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; दोन संशयित शूटर अटकेत

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई; लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा संशय, अमिताभ बच्चन यांच्या ‘बच गए’ पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने वेळीच कारवाई करत या प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून दोन शूटरना अटक केली आहे. यातील एका संशयिताला मुंबईतून, तर दुसऱ्याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये केवळ ‘बच गए’ असे दोन शब्द लिहिले होते. ही पोस्ट जलसा बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळल्याच्या वृत्ताशी संबंधित आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, या पोस्टचा नेमका संदर्भ अद्याप स्पष्ट झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित काही शूटर अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या तयारीत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. दिल्ली पोलिसांनी पंजाबमधील विकास ठाकूर उर्फ विक्की आणि दीपक सिंह उर्फ दीप या दोघांना अटक केली आहे. दीपकला मुंबईतून, तर विकास ठाकूरला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा –  राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा चर्चेत; संजय शिरसाटांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

दीपक सिंह हा पंजाबमधील तरनतारनचा, तर विकास ठाकूर हा जालंधरचा रहिवासी असल्याची माहिती आहे. विकासची चौकशी केल्यानंतर पोलिसांना मुंबईत असलेल्या दीपकबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

तपास यंत्रणांच्या संशयानुसार, दीपकला एका मोठ्या सुपरस्टारच्या घराबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी त्याने तयारीही केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करून त्याला अटक केल्याने हा कथित कट उधळल्याचे वृत्त आहे.

या घटनेमुळे अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसेच त्यांच्या ‘बच गए’ या पोस्टमागील नेमका अर्थ काय, याबाबतही सोशल मीडियावर तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, पोस्ट आणि कथित गोळीबाराच्या कटाचा परस्पर संबंध असल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group