ICC च्या अध्यक्षपदी जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड!
इंडोनेशियातील बाली येथे पार पडलेल्या बैठकीत शिक्कामोर्तब; २०२८ ऑलिम्पिकवर विशेष लक्ष

Jay Shah ICC Chairman | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी इंडोनेशियातील बाली येथे पार पडलेल्या आयसीसीच्या महत्त्वाच्या बैठकीत संचालकांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्वानुमते मंजुरी देत दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांची निवड जाहीर करण्यात आली. यापूर्वी त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिवपद यशस्वीरित्या भूषवले आहे.
फेरनिवडीनंतर आनंद व्यक्त करताना जय शाह म्हणाले की, “आयसीसीच्या संचालकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे. जगभरातील क्रिकेटच्या हितासाठी सर्व सदस्यांसह काम करण्यास मी कटिबद्ध आहे.”
हेही वाचा
पुढे भविष्यातील योजनांबद्दल बोलताना त्यांनी नमूद केले की, “क्रिकेटसाठी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रोमांचक टप्प्यात प्रवेश करत आहोत. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे ही आपल्या खेळासाठी मोठी संधी आहे. या माध्यमातून क्रिकेट नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल आणि खेळाडूंच्या तसेच चाहत्यांच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळेल.”
सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष ते मोटेरा स्टेडियमची उभारणी; असा राहिला प्रवास
जय शाह यांच्या प्रशासकीय प्रवासाचा आढावा घेता, २००९ मध्ये अहमदाबाद येथील सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट (CBCA) मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये (GCA) कार्यकारी सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली; पुढे २०११ मध्ये त्यांचा बीसीसीआयच्या मार्केटिंग समितीत समावेश झाला, तर अवघ्या २५व्या वर्षी (२०१३ मध्ये) त्यांनी जीसीएच्या सचिवपदापर्यंत मजल मारत अहमदाबादमधील तत्कालीन मोटेरा स्टेडियमच्या (सध्याचे नरेंद्र मोदी स्टेडियम) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमच्या भव्य पुनर्बांधणीत मोलाची भूमिका बजावली; आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान मिळवल्यानंतर २०२२ मध्ये त्यांच्याकडे आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते, आणि २०२४ च्या अखेरीस ग्रेग बार्कले यांच्या जागी वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष बनल्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा त्यांच्याकडे जागतिक क्रिकेटचे सर्वोच्च नेतृत्व आले आहे.




