TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

अजितदादांचा स्पष्टवक्तेपणा मला खूप आवडायचा; अमित शाहांनी सांगितले जुन्या आठवणींमधील किस्से!

‘होय तर होय, नाही तर नाही’ अशी अजित पवारांची भूमिका; पुण्यात अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात अमित शाह भावूक

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा, प्रशासनावरील पकडीचा आणि पुणे-पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण महाराष्ट्राशी असलेल्या नात्याचा उल्लेख केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही अजित पवारांसोबतच्या आठवणी आणि काही खास किस्से सांगितले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्ता भरणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली.

अमित शाह यांनी भाषणात अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणाचे विशेष कौतुक केले. “जे पटले ते होय आणि जे पटले नाही ते नाही, असे परखडपणे बोलणारे अजित पवार होते. महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चेदरम्यानही ते आपले मत स्पष्टपणे मांडायचे. होय तर होय आणि नाही तर नाही, हा त्यांचा स्वभाव मला खूप आवडायचा,” असे अमित शाह म्हणाले.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी पक्षातील नेते आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी अनेकदा आपल्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली, तसेच प्रसंगी वादही घातले, असे शाह यांनी सांगितले. आपल्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी ठामपणे उभे राहणारे नेते फार कमी असतात. अजितदादा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विचार करायचे, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; दोन संशयित शूटर अटकेत

सकाळी सात वाजताही व्हायचे फोनवरून बोलणे

अजित पवार यांचे व्यक्तिमत्त्व सकारात्मक आणि स्पष्टवक्ते होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून, आपलेही व्यक्तिगत नुकसान झाल्याची भावना अमित शाह यांनी व्यक्त केली. अजित पवार हे आपले मित्र आणि सहकारी होते, असे सांगताना त्यांनी सहकार क्षेत्राशी संबंधित एक आठवण सांगितली.

कोरोना काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्यात अडचणी येत असताना कामाच्या संदर्भात अजित पवार यांच्याशी सातत्याने संवाद होत असे. अनेकदा सकाळी सात वाजता लँडलाइनवरून त्यांच्याशी बोलणे व्हायचे. अजित पवार एवढ्या सकाळीही कार्यालयात उपस्थित राहून काम करत असत, अशी आठवण अमित शाह यांनी सांगितली.

अजित पवार यांच्या कामाचा झपाटा, निर्णयक्षमता, सहकार क्षेत्रातील अभ्यास आणि कार्यकर्त्यांशी असलेली बांधिलकी यांचा उल्लेख करत अमित शाह यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावरील वातावरण भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group