मंडणगडचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार; ४१.६९ कोटींच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ; मार्च २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश, ३० वर्षांचे पाणी नियोजन

रत्नागिरी : मंडणगड शहरवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत मंजूर झालेल्या ४१ कोटी ६९ लाख रुपये खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारून नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या सोहळ्यात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेले पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंडणगडकरांना दिवाळीची अविस्मरणीय भेट मिळाल्याचे गौरवोद्गार काढले.
मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश
भूमिपूजनप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी कामाची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादा याबाबत ठाम भूमिका मांडली. मंडणगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर शहरात पायाभूत सुविधांचा मोठा अभाव होता. जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असलेली आरोग्य विभागाची जागा मिळविण्याबाबतचा चार वर्षांपासूनचा तिढाही अवघ्या काही दिवसांत सोडविण्यात आला. कंत्राटदारांनी हे काम मार्च २०२७ पर्यंत दिलेल्या मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
योगेश कदम यांच्या कामाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
पालकमंत्री डॉ. उदय सामंत दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते म्हणाले की, एखाद्या लोकप्रतिनिधीने मंत्री झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाचा कायापालट कसा करावा, याचा वस्तुपाठ दापोली मतदारसंघात पाहायला मिळतो. योगेश कदम हे २४ तास जनतेच्या सेवेत कार्यरत असून थेट कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचून काम करणारे राज्यातील आघाडीचे नेते आहेत. शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे आगामी काळात नगरपंचायतीवर विकासाचा भगवा डौलाने फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – पंकजा मुंडे ऊसतोड मजुरांसोबत साजरी करणार भाऊबीज; मुळशीतील मजुरांच्या पालावर जाणार
आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा आणि ३० वर्षांचे नियोजन
सध्या शहरातील जुन्या जलवाहिन्यांमधील गळतीमुळे दर चार ते पाच दिवसांनी केवळ अर्ध्या शहराला पाणीपुरवठा होत होता. नव्या योजनेमुळे या व्यवस्थेत सुधारणा होणार आहे.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ५० टक्के म्हणजे २०.८५ कोटी रुपये, राज्य सरकारचा ४५ टक्के म्हणजे १८.७६ कोटी रुपये आणि नगरपंचायतीचा ५ टक्के म्हणजे २.०८ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.
योजनेअंतर्गत भारजा नदीवर जॅकवेल उभारण्यात येणार असून, २.५० एमएलडी क्षमतेचे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र बांधले जाणार आहे. या केंद्रातून नागरिकांना दररोज प्रतिमाणसी १३५ लिटर शुद्ध पाणी पुरविण्याचे नियोजन आहे.
पाण्याच्या साठवणुकीसाठी ३.२४ लाख लिटर क्षमतेची मुख्य संतुलन टाकी उभारण्यात येणार आहे. तसेच शिवाजीनगर, दुर्गवाडी, गांधीनगर आणि कोंझर या भागांत नवीन टाक्या बांधल्या जातील. शहरात ३५.२८ किलोमीटर लांबीचे वितरण जाळे उभारून २,८४० घरगुती आणि ३१६ व्यावसायिक नळजोडण्या देण्यात येणार आहेत.
वीज खर्चात बचत करण्यासाठी १५० किलोवॅट क्षमतेचा पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्ष २०५६ पर्यंत म्हणजेच पुढील ३० वर्षांची पाण्याची गरज पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, शशिकांत चव्हाण, प्रताप घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, उपसभापती दीपक मालुसरे, दापोली नगराध्यक्ष कृपा घाग, माजी नगराध्यक्ष राजू पेटकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि मंडणगडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




