TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

‘अजित पवारांच्या घातपाताबाबत एक दिवस बोलणार’; उमेश पाटील यांचे खळबळजनक वक्तव्य!

‘माझ्याकडे पुरावा नाही, पण घातपात झाल्याचे वाटते’; रामदास कदमांनी आरोपांचे पुरावे द्यावेत, विलीनीकरणाची सध्या कोणतीही चर्चा नसल्याचाही दावा

बारामती :  “अजित पवार यांचा घातपात झाला आहे, असे मला वाटते. याबाबत एक दिवस मी नक्की बोलेन. मात्र, सध्या माझ्याकडे यासंदर्भात कोणताही पुरावा नाही,” असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केले. कदम यांनी आरोप करताना पुरावे द्यावेत, हवेत बोलू नये, असेही पाटील म्हणाले. बारामती येथे एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

विलीनीकरणाची सध्या कोणतीही चर्चा नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतही उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. विलीनीकरणाच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. प्रत्यक्षात दोन्ही गटांमध्ये याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले.

सुनील तटकरे यांच्या विधानांमध्ये बदल झाल्याचे दिसत असून, त्यांची भूमिका आता तटस्थ झाल्याचे पाटील यांनी म्हटले. “मी जबाबदारीने सांगतो की, विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही. आगामी काळात अशी चर्चा होईल की नाही, हेही सांगता येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या पक्षाला एनडीएमध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांना सोबत घ्यायचे की नाही, याचा निर्णय भाजपने घ्यावा. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असणार, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, आमच्या गटातील आमदार शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा –  लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी मिळणार? २५ नोव्हेंबरपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता!

रामदास कदमांचे तटकरे यांच्यावर गंभीर आरोप

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “जो जो माणूस तटकरे यांना जवळ करतो, त्याला संपवण्याचे काम ते करतात. त्यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असे मी ऐकतोय. मग अजितदादांच्या घातपातामागे त्यांचाही हात होता का, या दिशेने तपास करावा,” असे कदम म्हणाले होते.

तसेच, तटकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी राक्षसी महत्त्वाकांक्षेचा आरोपही केला होता. मात्र, कदम यांनी केलेले सर्व आरोप सुनील तटकरे यांनी फेटाळले आहेत. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिले. याबाबत पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचेही तटकरे यांनी म्हटले आहे.

स्थानिक संघर्षातून आरोप-प्रत्यारोप?

रामदास कदम यांनी यापूर्वीही सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत, असे उमेश पाटील यांनी सांगितले. कोकणात तटकरे गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, शिवसेनेच्या विरोधात पक्ष रुजवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे या आरोपांकडे स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्या घातपाताबाबत उमेश पाटील यांनी केलेले विधान आणि रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सार्वजनिक झालेला नसल्याने या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group