Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दिवाळीत प्रताप सरनाईक-संजय राऊतांची भेट; शिवसेनेतील दुरावा कमी होणार?

वैयक्तिक संबंधांमुळे भेट झाल्याचे संजय राऊत यांचे स्पष्टीकरण; रिक्षाचालकांच्या प्रश्नावरही सरनाईकांचे केले होते कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठींचे फटाके फुटू लागले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकमेकांपासून दूर गेलेले नेते पुन्हा भेटू लागल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा दुरावा निर्माण झाला. दोन्ही गटांतील नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने टीका केली जात आहे. निवडणुकीच्या मैदानातही दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. दसरा मेळाव्यांमधूनही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार निशाणा साधला होता. अशा राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

या भेटीबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “मी घराच्या खाली आल्यावर प्रताप सरनाईक आल्याचे कळाले. आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांची आई आणि माझ्या आईचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दिवाळीचा सण आहे, त्यामुळे ते येणारच. यामागे कोणतेही राजकीय संकेत नाहीत. ते येतील, लाडू-चकली खातील. त्यांना ते आवडते. आईचा आशीर्वाद घेऊन निघून जातील. त्यापलीकडे काही नाही.”

हेही वाचा –  गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक आज; महायुतीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरणार निर्णायक!

शिवसेनेच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, राऊत यांनी अशी कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. “शिंदे गटात दोन शिंदे आहेत, ते तुम्ही शोधा,” अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. त्यामुळे या भेटीला राजकीय अर्थ देऊ नये, असा संदेश राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्यातील संवादाचा पूल यापूर्वीही कायम असल्याचे दिसून आले आहे. रिक्षाचालक आणि रॅपिडो बाईक टॅक्सी यांच्यातील वादाच्या वेळी अनेक रिक्षाचालक संघटनांनी बाईक टॅक्सी सेवेमुळे हजारो रिक्षाचालकांच्या व्यवसायावर संकट निर्माण होत असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली होती. त्यावेळी सरनाईक यांनी या प्रश्नावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांचे कौतुक केले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असले, तरी संवादाचे संबंध कायम असल्याचे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे.

आता दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या भेटीमुळे शिवसेनेतील दोन्ही गटांमधील संबंधांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेच्या विलीनीकरणाच्या शक्यतेबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, संजय राऊत यांनी या भेटीमागे कोणतेही राजकीय संकेत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group