शरद पवारांसोबत १० तारखेनंतर काय चर्चा होणार? प्रफुल पटेलांनी सांगितलं भेटीमागचं नेमकं कारण
ब्रीच कँडी रुग्णालयातील भेट राजकीय नव्हती, पटेलांचा खुलासा; “पवारसाहेबांबद्दल आदर होता, आहे आणि सदैव राहील”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. विशेष म्हणजे, १० तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू, असे शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांना सांगितल्याचा व्हिडिओही समोर आला होता. आता या भेटीबाबत प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
“रुग्णालयात राजकीय चर्चा करणे योग्य नव्हते”
शरद पवार यांची भेट नेमकी कशासाठी घेतली होती, याबाबत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, पवारसाहेब काही वैद्यकीय तपासण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असून त्यांचे आशीर्वाद नेहमीच लाभले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण रुग्णालयात गेलो होतो.
ही भेट अतिशय चांगल्या वातावरणात झाली. ईश्वराच्या कृपेने त्यांची प्रकृती सुधारली असून ते आता घरी परतले आहेत. भेटीदरम्यान नेहमीप्रमाणे थोडीफार इकडच्या-तिकडच्या विषयांवर चर्चा झाली; मात्र कोणताही विशेष राजकीय विषय चर्चेला आला नव्हता, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
१० तारखेनंतर घरी भेटून चर्चा करणार
१० तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करण्याबाबत विचारले असता पटेल म्हणाले की, दिवाळीनिमित्त आपण ८ आणि ९ नोव्हेंबरला गोंदिया येथे असणार असल्याची माहिती शरद पवार यांना होती. त्यामुळे १० तारखेनंतर मुंबईत परतल्यानंतर पुन्हा भेटण्याचे आपण सांगितले होते. रुग्णालयात असताना राजकीय चर्चा करणे योग्य नव्हते. त्यामुळे त्यावेळी कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा करण्याची आपली इच्छा नव्हती, असे त्यांनी सांगितले.
“पवारसाहेबांबद्दल माझ्या मनात आदर होता, आहे आणि सदैव राहील. त्यांची प्रकृती चांगली राहावी आणि त्यांनी राज्याला व देशाला दिशा देत राहावे, ही सर्वांचीच इच्छा आहे. गोंदियाचा दौरा करून आल्यानंतर रुग्णालयात नव्हे, तर त्यांच्या घरी जाऊन भेटू आणि चर्चा करू, एवढेच मी म्हटले होते. याचा अर्थ त्या चर्चेत काही राजकीय विषय असणारच, असे समजू नका,” असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही
यावेळी प्रफुल पटेल यांनी दिवाळीनिमित्त गोंदिया, भंडारा, महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यंदा शेतकरी आणि सामान्य नागरिक दुष्काळाच्या छायेत असून या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही प्रफुल पटेल यांनी दिली.




