TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! २०२२ मधील मनी लाँड्रिंग प्रकरण बंद; ED चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाकडून मंजूर

विशेष PMLA न्यायालयाने ECIR रद्द केला; सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित आरोपांच्या तपासाला पूर्णविराम

मुंबई : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील विशेष PMLA न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरोधात २०२२ मध्ये सुरू झालेले मनी लाँड्रिंग प्रकरण बंद झाले आहे.

विशेष PMLA न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी या प्रकरणात निर्णय देताना मूळ गुन्हा (Predicate Offence) असणे ही मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत कारवाईसाठी आवश्यक अट असल्याचे स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित मूळ गुन्हे रद्द केल्यामुळे PMLA अंतर्गत कारवाई पुढे सुरू ठेवता येणार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या निर्णयानुसार विशेष न्यायालयाने ४ एप्रिल २०२२ रोजी दाखल करण्यात आलेला अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) रद्द केला आहे. तसेच प्रकरणातील सर्व कागदपत्रे ED अधिकाऱ्यांकडे परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित आरोप काय होते?

कंपनी नोंदणी कार्यालयाने (RoC) मार्च २०२२ मध्ये दाखल केलेली तक्रार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२३ मध्ये दाखल झालेला एफआयआर (FIR) यांच्या आधारे ED ने हसन मुश्रीफ, त्यांच्या मुलांशी तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

२०१३-१४ या आर्थिक वर्षात साखर कारखान्याला कोलकात्यातील शेल कंपन्यांमार्फत ११.३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मिळाला आणि त्याद्वारे पैशांची हेराफेरी झाल्याचा आरोप ED ने केला होता. तपासादरम्यान जुलै २०२४ मध्ये ED ने २.०७ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि ७.७० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती.

हेही वाचा –  दिवाळीत मिठाई-खवा खरेदी करताना सावधान! तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा; FDA ची मोठी कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाकडून मूळ गुन्ह्यांशी संबंधित कारवाई रद्द

ED च्या कारवाईविरोधात हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. स्थानिक पोलिसांच्या तपास अधिकाऱ्याने या प्रकरणात सी-समरी (C Summary) अहवाल सादर केला होता. न्यायालयाने हा अहवाल स्वीकारल्यानंतर जून २०२५ मध्ये संबंधित एफआयआर रद्द केला.

तसेच कंपनी कायद्यातील २०२१ मधील दुरुस्त्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे न्यायालयातील तक्रारीसंदर्भातील प्रक्रिया रद्द केली होती.

दोन्ही मूळ गुन्ह्यांशी संबंधित कारवाई रद्द झाल्यानंतर ED ने विशेष PMLA न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. आता विशेष न्यायालयाने हा अहवाल स्वीकारत ECIR रद्द केला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरोधातील या मनी लाँड्रिंग प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group