साताऱ्यात ऊस दराचा तिढा कायम! ४,२०० ते ४,३०० रुपयांच्या मागणीवर स्वाभिमानी ठाम; पालकमंत्र्यांची बैठक निष्फळ
शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा नाही; कारखान्यांना दोन दिवसांत एफआरपीपेक्षा अधिक दर जाहीर करण्याच्या सूचना

सातारा : सातारा जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेली ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली. बैठकीत पालकमंत्र्यांनी मांडलेली दराची गणिते स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अमान्य केली. उसाला प्रतिटन ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये दर मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे. त्यामुळे साताऱ्यातील ऊस दराचा तिढा कायम असून रस्त्यावरील आंदोलनही सुरू राहण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांत कारखान्यांना दर जाहीर करण्याच्या सूचना
या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार धैर्यशील कदम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक किती दर देणार, याची माहिती येत्या दोन दिवसांत नोटीस बोर्डवर जाहीर करावी. तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
बैठकीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान टळावे, यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, संघटनेने हे आवाहन मान्य केले नाही.
हेही वाचा – हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! २०२२ मधील मनी लाँड्रिंग प्रकरण बंद; ED चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाकडून मंजूर
साताऱ्यातही कोल्हापूरच्या बरोबरीने दराची मागणी
दुसरीकडे, कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्यासोबत एफआरपी अधिक ५५० ते ६०० रुपये दराबाबत चर्चा सुरू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील उसाची रिकव्हरी कोल्हापूरच्या तुलनेत कमी असली, तरी साताऱ्यातील साखर कारखाने आधी सुरू झाले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील शेतकऱ्यांनाही कोल्हापूरच्या बरोबरीने दर मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार यांनी बैठकीनंतर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. उसाला प्रतिटन ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये दर मिळेपर्यंत माघार घेतली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहनही संघटनेने केले आहे.
४ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर देणे शक्य नाही; शिवेंद्रराजेंची भूमिका
दरम्यान, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ऊस दराच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट केली. साखर आणि इथेनॉलचे सध्याचे बाजारभाव लक्षात घेता उसाला प्रतिटन ४ हजार किंवा ४ हजार ५०० रुपये दर देणे सद्यस्थितीत कोणत्याही साखर कारखान्याला शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेकडून मिळणारी ३ हजार ७८० रुपयांची उचल आणि त्यातील टॅगिंग यांचाही विचार करावा लागेल. केवळ मोठा दर जाहीर करून प्रश्न सुटणार नाही, तर कारखान्यांनी अतिरिक्त रक्कम आणायची कुठून, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे साताऱ्यातील ऊस दराचा प्रश्न आता कारखाने येत्या दोन दिवसांत कोणता दर जाहीर करतात, यावर अवलंबून आहे. शेतकरी संघटनेने मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याने या संघर्षाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.




