Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ग्रामीण विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे; अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्यावर भर

एआय, रोबोटिक्स आणि डिजिटल शिक्षणाच्या वापरावर चर्चा; विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या मानसिक आरोग्यालाही प्राधान्य देण्याचे आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : डिजिटलायझेशनच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून सोप्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

अंधेरी येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’च्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘एज्युकेशन कनेक्ट एक्स्पो’चे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी एज्युकेशन ग्रोथ नेटवर्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉली सिंग उपस्थित होत्या. शिक्षण क्षेत्रातील नव्या संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शैक्षणिक विकासाच्या विविध पैलूंवर या प्रदर्शनात विचारमंथन होत आहे.

बालधोरणात शैक्षणिक चर्चेतील सूचनांचा समावेश करणार

या एक्स्पोमध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींकडून मांडण्यात येणाऱ्या सूचना व निष्कर्षांचा राज्याच्या प्रस्तावित बालधोरणात समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आधुनिक शिक्षणाच्या संधी सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर आवश्यक

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणेही महत्त्वाचे आहे. वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा आणि शिक्षणासाठी होणारी गुंतवणूक यांमुळे मुलांवर मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे तटकरे म्हणाल्या.

सरकारी शाळांमधील विद्यार्थी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘सेवा फर्स्ट’ला १.०७ लाखांहून अधिक युवकांचा प्रतिसाद; ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाखांचे कार्यादेश

शाळांमध्ये आधुनिक शैक्षणिक सुविधांचे प्रायोगिक उपक्रम

एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क, शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि उपक्रम राबविण्याबाबत शासन विचार करेल, असे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.

पुढील पाच वर्षांत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे आणि शासनासह शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये समन्वय वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल बोर्डच्या वापरासाठी शिक्षकांना प्रशिक्षण

डिजिटल शिक्षण प्रभावी करण्यासाठी शाळांमध्ये डिजिटल बोर्ड बसविण्याबरोबरच शिक्षकांना त्यांचा योग्य वापर करता यावा, यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षकांना किमान दोन दिवसांचे म्हणजेच ४८ तासांचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि कल्याणही महत्त्वाचे आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा एकत्रित विचार करून त्या सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एक्स्पोमध्ये ६० ते ७० स्टॉल्सचे आकर्षण

‘एज्युकेशन कनेक्ट एक्स्पो’मध्ये ६० ते ७० स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून डिजिटल बोर्डद्वारे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, शाश्वत विकासाशी संबंधित उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी विकसित करण्यात आलेली नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधने आणि सुविधांची माहिती देण्यात आली.

आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी समान संधी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार या मुद्द्यांवर या एक्स्पोच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group