राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी मंत्र्याचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार? सुनेत्रा पवार यांची फडणवीसांकडे मागणी
दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा निवासस्थानी चर्चा झाल्याची माहिती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे. पक्षातील एका माजी मंत्र्याचे लवकरच राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका माजी मंत्र्याने आणि एका वरिष्ठ मंत्र्याने रविवारी रात्री दिल्लीत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने संबंधित माजी मंत्र्याच्या पुनरागमनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना वेग आला आहे.
सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबीयांची फडणवीसांशी भेट
संबंधित माजी मंत्र्याच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे.
या भेटीदरम्यान आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात संबंधित नेत्याला सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या चर्चेत धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – रात्री शांत आणि गाढ झोप हवीय? आहारात समाविष्ट करा अक्रोड, पिस्ता, किवी आणि पालक; जाणून घ्या फायदे
अमित शाह यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती
सुनेत्रा पवार यांनी या विषयासंदर्भात यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, गुरुवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि धनंजय मुंडे यांनी चर्चा केल्याचे समजते.
आज देवगिरी निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४ वाजता देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत संबंधित माजी मंत्र्याच्या पुनरागमनाबाबत तसेच संभाव्य खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित माजी मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्यांपैकी एका खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाऊ शकते. मात्र, संबंधित नेत्याचे नाव आणि मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात कोणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




