Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्त सोलापूरसाठी शरद पवारांची ५० लाखांची मदत; तुळशी गावाला दिली भेट

माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा; शेतकऱ्यांशी बांधावर संवाद, पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्यात प्रश्न मांडण्यासाठी वेळ मागणार

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातून आपल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांनी माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी गाव विक्रीला काढल्याचे बॅनर झळकवणाऱ्या तुळशी गावालाही त्यांनी भेट दिली. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली.

शरद पवार यांनी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाणीटंचाई, शेतीसमोरील अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. ज्या माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती, त्याच भागातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

१९७२ च्या दुष्काळाची आठवण; तुळशी गावाला ५० लाखांची मदत

दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी १९७२ मधील दुष्काळाची आठवण सांगितली. त्यावेळी आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होतो. त्या काळात सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला होता, असे त्यांनी नमूद केले.

तुळशी गावातील पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीसाठी ५० लाख रुपयांची मदत देऊ केली. या मदतीचा धनादेश त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

हेही वाचा –  ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक; ३ नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन

शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवणार

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येतील, तेव्हा खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मराठवाड्याचा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर आपण मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीवर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. आता सरकारकडून या परिस्थितीवर कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button