‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका वाढला; आंध्र, ओडिशात हायअलर्ट, ५३ रेल्वे गाड्या रद्द तर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Arnab Cyclone Andhra Pradesh Odisha Alert | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्नब’ चक्रीवादळ वेगाने तीव्र होत असून, पूर्व किनारपट्टीवर धोक्याची घंटा वाजली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ ऑक्टोबर रोजी हे वादळ पुद्दुचेरीतील यानमजवळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२५ किमी, तर कमाल झोतांचा वेग ताशी १४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. संभाव्य धोका पाहता आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. किनारपट्टी भागांतील समुद्रकिनारे आणि सर्व शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. सर्वाधिक धोकादायक भागांमधील तब्बल ४ हजार ७११ गर्भवती महिलांना आधीच सुरक्षितपणे रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे. आपत्कालीन मदतीसाठी २० जिल्ह्यांना २७ कोटींचा निधी वितरित करण्यात आला असून, एनडीआरएफची (NDRF) १५ पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच १ हजार ७६३ निवारा केंद्रे आणि नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा
हॅरी केन ठरला बॅलोन डी’ओर २०२६ चा विजेता! एकाच हंगामात ७३ गोलचा पराक्रम!
ओडिशातील ६ जिल्ह्यांत शाळा बंद, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द
ओडिशातील दक्षिणेकडील भागांत ताशी ८० किलोमीटर वेगाचे वारे आणि अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गंजाम, गजपती, रायगडा, मलकानगिरी, कोरापुट आणि नबरंगपूर या सहा जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी बंद राहतील. परिस्थितीवर देखरेखीसाठी आठ मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संवेदनशील जिल्ह्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. ओड्राफची (ODRAF) २४ आणि एनडीआरएफची ६ पथके सज्ज ठेवण्यात आली असून, शेतकऱ्यांना उभी पिके तात्काळ कापून सुरक्षित साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस, दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाचा धोका
वादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा, मेदिनीपूर, झारग्रामसह दार्जिलिंग, कालिम्पोंग भागात २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय तेलंगणा, छत्तीसगड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
५३ रेल्वे गाड्या रद्द; नियंत्रण कक्ष सुरू
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दक्षिण किनारपट्टी रेल्वेने ५३ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख रेल्वे स्थानकांवर २४ तास नियंत्रण कक्ष, मदत केंद्रे, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. किनारपट्टी भागातील नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




