Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळगावच्या किनगावात RSS पथसंचलनावर दगडफेक; ५० ते ६० जणांवर गुन्हा, २० जण ताब्यात

दगडफेकीत ७ ते ८ पोलीस कर्मचारी जखमी; गावात तणावपूर्ण शांतता, SRPF आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या किनगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनादरम्यान दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेत सात ते आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, १८ ते २० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

किनगावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

दगडफेकीच्या घटनेनंतर किनगावात तणावपूर्ण शांतता आहे. गावातील जनजीवन सुरळीत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. राज्य राखीव पोलीस दल (SRPF), आरसीबी प्लाटून आणि स्थानिक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षकांनीही रात्री किनगावला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

हेही वाचा – शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास फायनान्स कंपन्यांवर कारवाई; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा इशारा

पथसंचलनादरम्यान दगडफेक

मिळालेल्या माहितीनुसार, किनगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वार्षिक पथसंचलन सुरू असताना अचानक एका गटाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला. पथसंचलनाला एका गटाचा विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आणि नागरिकांना शांतता राखण्याच्या सूचना दिल्या.

जमाव पांगल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात पथसंचलन सुरळीत पार पडले. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये काही महिलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button