Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज; प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावा – गिरीश महाजन

३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अभियानाला सुरुवात; आगामी कुंभमेळ्यात १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिकमध्ये भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा. कुंभमेळा हा केवळ प्रशासनाचा किंवा लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम नसून, तो संपूर्ण नाशिककरांचा उत्सव आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावून या धार्मिक पर्वाच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री महाजन यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भगवा ध्वज फडकवून या अभियानाचा प्रारंभ केला. यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

१२ कोटी भाविक येण्याचा अंदाज

पालकमंत्री महाजन म्हणाले की, ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक प्रारंभाची नांदी होणार आहे. त्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात लोकसहभागातून वातावरणनिर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. मागील कुंभमेळ्यात सुमारे तीन ते सव्वातीन कोटी भाविक सहभागी झाले होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची संख्या सुमारे १२ कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि स्नानघाटांवरील नियोजन यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील भौगोलिक परिस्थिती तसेच उपलब्ध जागेच्या मर्यादा लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गांभीर्याने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा –  भंडारा जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाला निर्देश; पीककर्जाचे पुनर्गठन, वसुली थांबवण्याचे आदेश

नाशिककरांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा

कुंभमेळा हा श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. या सोहळ्यासाठी भाविकांना स्वतंत्र निमंत्रण देण्याची आवश्यकता नसते. देशभरातून भाविक स्वयंस्फूर्तीने या धार्मिक पर्वात सहभागी होतात. त्यामुळे कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय तयारीसोबतच नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकला पाहिजे आणि संपूर्ण नाशिक शहर भगव्या ध्वजांनी सजलेले दिसले पाहिजे. यासाठी संबंधितांनी आपापल्या परिसरात घरोघरी संपर्क साधून नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. ध्वज लावण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांच्या सहकार्याने हे अभियान व्यापक स्वरूपात राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कुंभमेळा हा प्रत्येक नाशिककरांचा उत्सव असल्याची भावना नागरिकांच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या गावासाठी आणि शहरासाठी जबाबदारी स्वीकारून योगदान दिल्यास देशभरात नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि लोकसहभागाचा सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा भव्य, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री महाजन, उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातही सहभाग नोंदविला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button