पी. व्ही. सिंधूची फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक; हिना अकेचीचा पराभव
१ तास १३ मिनिटांच्या चुरशीच्या लढतीत २१-१०, २०-२२, २१-१६ ने विजय; विजेतेपदासाठी जागतिक क्रमवारीतील अव्वल आन से यंगशी सामना

PV Sindhu Enters French Open Final Beat Hina Akechi in Semifinal : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने फ्रेंच ओपन सुपर ७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या हिना अकेची हिचा २१-१०, २०-२२, २१-१६ असा तीन गेममध्ये पराभव केला. तब्बल १ तास १३ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवत सिंधूने यंदा दुसऱ्यांदा सुपर ७५० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यापूर्वी तिने जुलैमध्ये जपान ओपनचे विजेतेपद पटकावले होते. आता फ्रेंच ओपनच्या विजेतेपदासाठी तिचा सामना दक्षिण कोरियाच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आन से यंग हिच्याशी होणार आहे.
पहिल्या गेममध्ये सिंधूचे वर्चस्व
जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असलेल्या हिना अकेचीने सुरुवातीला सिंधूला चांगली टक्कर दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये ४-४ आणि ८-८ अशी बरोबरी झाली. मात्र, सिंधूने खेळाचा वेग वाढवत मध्यंतरापर्यंत ११-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर आक्रमक खेळ करत तिने अखेरच्या १२ पैकी ११ गुण जिंकले आणि अवघ्या १८ मिनिटांत पहिला गेम २१-१० असा खिशात घातला.
दुसऱ्या गेममध्ये अकेचीची पुनरागमनाची झुंज
दुसऱ्या गेममध्ये जपानी खेळाडूने जोरदार पुनरागमन केले. सिंधूने क्रॉस-कोर्ट स्मॅशच्या जोरावर बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या टप्प्यात सिंधूने २०-२० अशी बरोबरी करत गेम पॉइंट वाचवला; मात्र निर्णायक क्षणी तिचा फटका कोर्टाबाहेर गेल्याने अकेचीने २२-२० असा गेम जिंकला. त्यामुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली.
हेही वाचा – नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून गोळीबार; दोन आरोपींना अटक, गावठी कट्टा जप्त
निर्णायक गेममध्ये सिंधूचा दमदार खेळ
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. स्कोअर १५-१५ असा असताना तब्बल ३८ शॉट्सची दीर्घ रॅली रंगली. या रॅलीत अकेचीकडून नेटजवळ चूक झाल्यानंतर सिंधूने १८-१६ अशी महत्त्वाची आघाडी घेतली. त्यानंतर अचूक नेट शॉट्स आणि भेदक क्रॉस-कोर्ट स्मॅशच्या जोरावर तिने २१-१६ असा गेम जिंकत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
आता आन से यंगचे आव्हान
फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सिंधूसमोर दक्षिण कोरियाची जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आन से यंग हिचे आव्हान असेल. जपान ओपननंतर आणखी एक सुपर ७५० विजेतेपद मिळवण्याची संधी सिंधूला मिळाली आहे. त्यामुळे अंतिम सामन्याकडे भारतीय बॅडमिंटन चाहत्यांचे लक्ष लागले आहे.




