नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून गोळीबार; दोन आरोपींना अटक, गावठी कट्टा जप्त
विवाहित महिलेच्या प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून पतीवर गोळीबार केल्याचा आरोप; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई

नाशिक : नाशिक शहरातील आडगाव परिसरात एकतर्फी प्रेमप्रकरणातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने राहुल आंबेकर आणि विकास सोनवणे या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. फिर्यादीची पत्नी आणि आरोपी एकाच ठिकाणी कामाला होते. यावेळी आरोपी संबंधित महिलेला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप आहे. मात्र, महिलेने नकार दिल्यानंतर राहुल आंबेकर याने तिच्या पतीवर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
हेही वाचा – कर्जतमध्ये ३२ हजार झाडांची कत्तल? रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ‘झाडखाऊ सरकार!’
या घटनेनंतर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने आरोपींचा शोध सुरू केला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रामवाडी रोडवरील कोशिरे मळा परिसरातून दोघांना ताब्यात घेत अटक केली. कारवाईदरम्यान त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन आणि गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे गोळीबार प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.




