Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तिहारमधून सुटका; २३ ऑक्टोबरला देशव्यापी आंदोलनाची हाक

नवी दिल्ली | जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान लावलेले बॅरिकेड्स (अडथळे) ओलांडून निदर्शने केल्याप्रकरणी अटकेत असलेले ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची अखेर सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर बुधवारी सुटका करण्यात आली. विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकारी (SEM) तथा साहाय्यक पोलीस आयुक्त रितू राज यांनी दोघांचीही तिहार तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. सुटकेपूर्वी या दोघांना बुधवारी दुपारी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते.

१० ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सौरव दास व आशुतोष रांका यांच्याकडून शांतता राखण्याचे बंधपत्र लिहून घेतले होते. या अटींचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना आधी १४ ऑक्टोबरला पाच दिवसांची आणि नंतर १९ ऑक्टोबरला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी आणखी तीन दिवसांची कोठडी मागितली होती; मात्र ‘एसईएम’ यांनी ती फेटाळत सुटकेचा मार्ग मोकळा केला. जामीनदारांच्या कागदपत्रांतील छायाचित्रे आणि ओळखपत्रांवरील छायाचित्रांमध्ये तफावत आढळल्याचे कारण देत यापूर्वी जामीनदारांवर आक्षेप नोंदवण्यात आला होता.

‘एसईएम’च्या सुटकेच्या आदेशापूर्वी रांका आणि दास यांनी अतिरिक्त कोठडीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी, “दुपारी दोन वाजता काय निर्णय होतो ते पाहा आणि त्यानंतर कायदेशीर मार्ग अवलंबा,” असा सल्ला दिला होता.

हेही वाचा

प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावा

दरम्यान, सुनावणीवेळी जुलैमध्ये झालेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटीविरोधातील ‘जेन-झी’ (Gen-Z) आंदोलनाचा संदर्भ देत न्यायालयाने वकिलांना विचारणा केली. त्यावर दास यांचे वय २७ आणि रांका यांचे वय ३१ वर्षे असल्याचे वकिलांनी सांगितले. यावर न्यायालयाने, “मग तुम्ही जेन-झी नाहीत. तेव्हा विद्यार्थी आंदोलन होते, आता कारण वेगळे आहे; मात्र चेहरे तेच आहेत. जर तुम्ही जेन-झी नाही, तर तुम्ही कोण आहात? तुमची संघटना कोणती आणि तिचे नेमके उद्दिष्ट काय?” असे थेट सवाल उपस्थित केले.

नेहा बोरा यांच्या याचिकेवर आज सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालयात विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांच्या याचिकेवर आज (गुरुवारी) सुनावणी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना १० हजार रुपयांचे शांतता बंधपत्र आणि जामीनदार देण्याची नोटीस बजावली असून, त्याविरोधात बोरा यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी दास व रांका यांच्या सुनावणीमुळे बोरा यांच्या वकिलांनी ही सुनावणी आज ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती.

२३ ऑक्टोबरला देशव्यापी आंदोलनाची हाक

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि मतदार याद्यांच्या फेरआढाव्याच्या विशेष मोहिमेला (SIR) तत्काळ स्थगिती, या दोन प्रमुख मागण्यांसाठी ‘पीपल्स अगेन्स्ट एसआयआर’ आणि ‘संयुक्त किसान मोर्चा’ यांच्या वतीने २३ ऑक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाला ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, शेतकरी नेते राकेश टिकैत, अभिनेते प्रकाश राज, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज, गणेश देवी, तुषार गांधी, CJP नेते अभिजीत दिपके, नेहा बोरा, आइशे घोष, विराज देवांग आदी प्रमुख मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button