होर्मुझच्या सामुद्रधुनीत कुवेती तेल टँकरवर हल्ला; जहाजावरील २१ भारतीय खलाशी सुरक्षित

नवी दिल्ली | जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना कुवेतचा ध्वज असलेल्या एका तेलवाहू टँकरवर २१ ऑक्टोबर रोजी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ‘एम/टी अल दास्मा’ असे या जहाजाचे नाव असून, त्यावर २१ भारतीय खलाशांसह इतर कर्मचारी कार्यरत होते. सुदैवाने या हल्ल्यात जहाजावरील सर्व २१ भारतीय खलाशी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली. जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार सातत्याने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, जहाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या संबंधित कंपनीशी थेट संपर्क साधण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
⚠️ IMPORTANT UPDATE ⚠️
On Oct 21, Kuwait-flagged oil product tanker M/T AL DASMA, carrying 21 Indian seafarers, was struck by an unknown projectile while transiting the Strait of Hormuz.
All 21 of our Indian crew members, along with the rest of the crew are completely safe.
We are continuously monitoring the situation and remain in close contact with the ship management company to ensure the ongoing security and wellbeing of our seafarers.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) October 21, 2026
हेही वाचा
CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तिहारमधून सुटका; २३ ऑक्टोबरला देशव्यापी आंदोलनाची हाक
‘एम/टी अल दास्मा’ हा टँकर कच्च्या तेलाची वाहतूक करत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करत असताना त्यावर अचानक अज्ञात वस्तू येऊन आदळली. हा हल्ला नेमका कोणी आणि कुठून केला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या हल्ल्यात जहाजाचे प्रत्यक्ष किती नुकसान झाले किंवा त्यातील खनिज तेलाच्या साठ्याला काही हानी पोहोचली आहे का, याचा सविस्तर तपशील अद्याप तपास यंत्रणांकडून जाहीर करण्यात आलेला नाही.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. जगभरातील मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक याच मार्गाने होत असल्याने, या पट्ट्यातील असुरक्षिततेचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर आणि व्यापारी जहाजांच्या हालचालींवर होण्याची शक्यता असते.
विशेष म्हणजे, या भागात जहाजांवर हल्ले होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी याच सामुद्रधुनीत ‘एमटी एसटी ३’ या कच्च्या तेलाच्या टँकरवरही असाच हल्ला करण्यात आला होता. त्या जहाजावरील १५ भारतीय खलाशीही सुरक्षित राहिले होते. अवघ्या पाच दिवसांच्या अंतराने पुन्हा एका तेलवाहू जहाजाला लक्ष्य करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय सागरी वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.




