टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: शूटरना शस्त्रे पुरवणाऱ्या दोन महिलांसह चौघांना दिल्लीतून अटक

मुंबई | अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. राजस्थानच्या कोटा येथून अटक करण्यात आलेल्या तिन्ही शूटरना मुंबईत आणण्यात आले असतानाच, या हल्लेखोरांना बंदुका व शस्त्रे पुरवणाऱ्या टोळीचाही पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात शस्त्र पुरवठा केल्याच्या आरोपावरून राधा आणि बबिता या दोन महिलांसह एकूण चौघांना दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू येथे टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर हल्लेखोरांना हत्यारे कोणी पुरवली याचा शोध सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली स्थानकावर सापळा रचून राधा आणि बबिता या दोन महिलांना शस्त्रास्त्रांची रसद पुरवल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात एकूण चार आरोपींना पकडण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID/Crime Branch) त्यांची रीतसर कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.
हेही वाचा
स्मृती मानधनाची ‘कॅप्टन’ म्हणून विजयी सुरुवात! भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका
अॅपद्वारे संपर्क आणि अनिल पंडित कनेक्शन
पोलिसांनी उघड केलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी ‘कुशल’ नावाचा आरोपी नुकताच एका गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता. हरसाणा गावातील एका मित्राच्या माध्यमातून कुशलची ओळख एका मेसेजिंग ॲपद्वारे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित अनिल पंडितशी झाली होती. या ॲपच्या माध्यमातूनच आरोपी एकमेकांशी सातत्याने संपर्कात होते आणि हल्ल्याचा कट रचला जात होता. या कटात राधा, बबिता आणि त्यांच्या साथीदारांनी हल्लेखोरांपर्यंत बंदुका पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निष्पन्न झाले आहे.




