पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, 4 तरुण जागीच ठार तर तिघे गंभीर

सातारा | पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराजवळ नव्याने सुरू झालेल्या सहापदरी उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव स्कॉर्पिओने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व तरुण कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना ही काळाची झडप पडली.
कातर खटाव (ता. खटाव, जि. सातारा) येथील सात तरुण स्कॉर्पिओ गाडीने कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास गावाकडे परतत असताना कराड शहराजवळील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला. गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली स्कॉर्पिओ थेट ट्रकला पाठीमागून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा चक्काचूर झाला.
हेही वाचा
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: शूटरना शस्त्रे पुरवणाऱ्या दोन महिलांसह चौघांना दिल्लीतून अटक
या दुर्घटनेत तेजस देशमुख (वय २५, चालक), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१, सर्व रा. कातर खटाव) या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ऋतुराज दुबळे (वय २१), शांतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
पोलीस यंत्रणेकडून तातडीने मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्यासह वाहतूक शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनात अडकलेल्या तरुणांना बाहेर काढून जखमींना रुग्णालयात हलवले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. एकाच गावातील चार तरुणांचा अशा दुर्देवी अपघातात मृत्यू झाल्याने कातर खटाव परिसरावर शोककळा पसरली आहे.




