Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

स्मृती मानधनाची ‘कॅप्टन’ म्हणून विजयी सुरुवात! टीम इंडियाचा झिम्बाब्वेला ३-० ने व्हाईटवॉश

India vs Zimbabwe 3rd T20I Series | रायपूर येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा ९२ धावांनी धुव्वा उडवत मालिका ३-० अशी एकतर्फी जिंकली. भारताने उभारलेल्या २१६ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १२४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताच्या या दणदणीत विजयाची खरी शिल्पकार ठरली ती माजी कर्णधार हरमनप्रीत कौर, जिने तुफानी खेळी करत टीकाकारांची बोलती पूर्णपणे बंद केली.

कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, या सामन्यात तिने अवघ्या ४१ चेंडूंत नाबाद ९१ धावांची विध्वंसक खेळी साकारली. या स्फोटक डावात तिने १० चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकले. अवघ्या २५ चेंडूंत अर्धशतक झळकावणाऱ्या हरमनप्रीतने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. सामना संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ती काहीशी भावुक झालेली पाहायला मिळाली.

हेही वाचा

भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू; भारतीय वस्तूंना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत विनाशुल्क प्रवेश

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला सलामीवीर शफाली वर्माने आक्रमक सुरुवात करून दिली. शफालीने अवघ्या ३७ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ६९ धावांची आतषबाजी केली. शफाली आणि हरमनप्रीत यांच्या वादळी फटकेबाजीच्या बळावर भारताने २० षटकांत ७ बाद २१६ धावांचा विशाल धावफलक उभारला. झिम्बाब्वेकडून बेलोव्हड बीझाने ३ गडी बाद केले.

भारताचा ९२ धावांनी मोठा विजय

२१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. शार्ने मेयर्सने ४९ चेंडूंत ६० धावा आणि बेलोव्हड बीझाने ५० चेंडूंत ४४ धावा करत एका बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला; मात्र वाढत्या धावगतीचा दबाव आणि भारताच्या अचूक माऱ्यासमोर इतर फलंदाजांनी नांगी टाकली. अखेर झिम्बाब्वेला १२४ धावांवर रोखून भारताने ९२ धावांनी दिमाखदार विजय मिळवला आणि मालिका निर्विवादपणे आपल्या नावे केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button