Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोकुळ दूध संघाच्या सत्तेचा आज फैसला! महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

99.96 टक्के मतदानाची नोंद; 25 संचालकपदांसाठी 50 उमेदवार रिंगणात, रमणमळा येथे 35 टेबलांवर मतमोजणी

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून लक्ष वेधून घेतलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तेचा फैसला आज, 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी रविवारी (18 ऑक्टोबर) अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. पात्र मतदारांपैकी 99.96 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने आता निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे.

5,418 पैकी 5,416 मतदारांनी बजावला हक्क

गोकुळच्या निवडणुकीसाठी एकूण 5,418 पात्र मतदार होते. त्यापैकी 5,416 मतदारांनी मतदान केले. कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 35 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यापैकी 10 तालुक्यांमध्ये 100 टक्के मतदानाची नोंद झाल्याचे वृत्त आहे. विक्रमी मतदानामुळे दोन्ही आघाड्यांमधील चुरस वाढली असून, मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

25 जागांसाठी 50 उमेदवारांमध्ये लढत

गोकुळच्या संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी एकूण 50 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने आव्हान दिले आहे. या निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांची साथ सतेज पाटील यांना मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय प्रतिष्ठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

हेही वाचा –  टायगर श्रॉफवरील गोळीबारावर अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘विद्यार्थ्यांऐवजी खऱ्या आरोपींकडे लक्ष द्या’

मतमोजणीसाठी 35 टेबलांची व्यवस्था

मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. रमणमळा येथे मतमोजणीसाठी एकूण 35 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोकुळची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत दूध उत्पादक, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

भंडारा आणि शपथांच्या मुद्द्यावरून निवडणूक चर्चेत

गोकुळची निवडणूक केवळ उमेदवारांमधील लढतीपुरती मर्यादित राहिली नाही. पात्र-अपात्र संस्थांचा वाद, प्रशासक नियुक्तीचा मुद्दा आणि मतदानापूर्वी ठरावधारकांना सौंदत्ती येथे नेऊन यल्लमा देवीच्या भंडाऱ्यावर शपथा घेतल्याच्या आरोपांमुळे निवडणूक चर्चेत आली.

ठरावधारकांवर विशिष्ट उमेदवारांना मतदान करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित व्हिडिओही चर्चेत आला. आमदार सतेज पाटील यांनी या प्रकारावर आक्षेप घेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केल्याचे वृत्त आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. बेळगावमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचेही सांगितले जात आहे.

आता या सर्व राजकीय घडामोडींनंतर मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. गोकुळच्या सत्तेवरील वर्चस्वासाठी सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button