Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

हार्दिकचा पर्याय शोधणे थांबवा; फलंदाजीच्या नादात गोलंदाजीशी तडजोड नको: सुनील गावस्कर

नवी दिल्ली | स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची तंदुरुस्ती हा सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असताना, भारताचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ समालोचक सुनील गावस्कर यांनी या मुद्द्यावर रोखठोक मत व्यक्त केले आहे. “हार्दिक पंड्या हा एका वेगळ्याच धाटणीचा खेळाडू आहे, त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र, त्याचा तंतोतंत पर्याय शोधण्याच्या नादात भारतीय संघ व्यवस्थापन सध्या वाहवत चालले आहे,” असे स्पष्ट मत गावस्कर यांनी मांडले आहे.

सुनील गावस्कर यांच्या मते, केवळ आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी वाढवण्याच्या नादात भारताने आपल्या प्रमुख गोलंदाजीच्या ताकदीशी तडजोड करू नये. “ज्या क्षणी तुम्ही आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी नेण्याचा प्रयत्न करता, त्याच क्षणी तुम्ही गोलंदाजी कमकुवत करता आणि नेमकी तिथेच सामन्यात पराभवाची शक्यता वाढते,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. भारताने मैदानात उतरताना किमान चार तज्ज्ञ गोलंदाज खेळवावेत आणि पाचवा व सहावा पर्याय म्हणून फलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

हेही वाचा

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणावरून फडणवीस-राऊत आमनेसामने; संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर एकेरी टीका

हार्दिकसारखा खेळाडू मिळत नसेल, तर वेगवेगळ्या भूमिका बजावू शकणाऱ्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे, असे सांगत गावस्कर यांनी नमन धीरचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “सध्या नमन धीर ही भूमिका चोख बजावत आहे. तो चांगली षटके टाकत आहे आणि त्याने पावसाने बाधित सामन्यात केलेली फलंदाजी आपण पाहिली आहे. तो मूळचा फलंदाज असला, तरी तो दोन-तीन षटके सहज टाकू शकतो; तर दुसरीकडे अक्षर पटेल आपल्या कोट्यातील चार षटके पूर्ण करू शकतो. त्यामुळे चार नियमित गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडू हेच समीकरण योग्य राहील.”

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिका २-२ अशी बरोबरीत सुटल्यानंतर, अखेरच्या नऊ षटकांच्या पावसामुळे बाधित सामन्यात भारताच्या गोलंदाजांची परीक्षा पाहण्याची संधी हुकल्याबद्दल गावस्कर यांनी खंत व्यक्त केली. याशिवाय, संघ व्यवस्थापनाने फिरकी गोलंदाजांची पसंती निश्चित करून त्यांना सातत्याने विश्वास देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. टी-२० सारख्या छोट्या प्रारूपात फिरकीपटू खूप लवकर आत्मविश्वास गमावू शकतात; त्यामुळे ते अंतिम अकरा जणांत नसले तरी मोठ्या योजनेचा भाग आहेत, असा दिलासा त्यांना देणे गरजेचे असल्याचे गावस्कर यांनी अधोरेखित केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button