फ्रान्समध्ये आंदोलनाला हिंसक वळण; टाउन हॉल जळाला, १८०० जण गजाआड तर ५०० पोलीस जखमी

पॅरिस | वाढती महागाई आणि निकृष्ट सरकारी सेवांविरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जनआंदोलनाला शनिवारी अत्यंत हिंसक वळण लागले. देशभरात उसळलेल्या दंगलीदरम्यान सरकारी इमारती, टाउन हॉल आणि व्यावसायिक दुकानांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणावर जाळपोळ व तोडफोड करण्यात आली. या हिंसक संघर्षात देशभरात सुमारे १८०० आंदोलकांना अटक करण्यात आली असून, ५०० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आंदोलनादरम्यान एका निदर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर एकट्या राजधानी पॅरिसमधून तब्बल ८५५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फ्रान्समध्ये गेल्या महिनाभरापासून शाळांची दुरवस्था, पायाभूत सुविधांचा अभाव आणि शिक्षकांची कमतरता या मागण्यांवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. मात्र शनिवारी या आंदोलनात लक्षावधी सामान्य नागरिक सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मूलभूत मुद्द्यांसह देशातील वाढती महागाई आणि ढिसाळ सरकारी सेवा यांविरोधात नागरिकांचा संताप अनावर झाला. बहुतांश ठिकाणी निदर्शने शांततेत पार पडली असली, तरी काही समाजकंटक आणि हिंसक गटांनी सरकारी मालमत्ता, दुकाने आणि पोलिसांच्या वाहनांवर थेट हल्ले चढवले.
हेही वाचा
टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर फडणवीसांचा इशारा; ‘मुंबई पोलिसांना कोणी उघडपणे चॅलेंज देऊ शकत नाही’
या हिंसाचाराचा मोठा फटका ऐतिहासिक वास्तूंना बसला आहे. लिमोज शहरातील १९व्या शतकातील प्रसिद्ध ‘सिटी हॉल’ (टाउन हॉल) आंदोलकांनी पेटवून दिल्याने तो जळून खाक झाला. पॅरिससह मार्सेल, लियाँ, बोर्डो, रेन, स्ट्रासबर्ग, ग्रेनोबेल, नीस आणि लिमोज या प्रमुख शहरांमध्ये शेकडो दुकानांची लूटमार आणि नासधूस करण्यात आली. फ्रान्सचे पंतप्रधान सेबास्तीयन लेकोर्नू यांनी या विध्वंसामागे अतिरेकी डाव्या गटांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे.
“हिंसेला थारा नाही, कठोर कारवाई होणार” – इमॅन्युएल मॅक्रॉन
देशभरातील वाढत्या हिंसाचारावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “फ्रान्समध्ये अशा हिंसेला अजिबात थारा दिला जाणार नाही. ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली आहे, व्यापाऱ्यांची दुकाने लुटली आहेत आणि नगर परिषदांवर हल्ले चढवले आहेत, अशा प्रत्येकाला शोधून काढून कठोर शिक्षा ठोठावली जाईल,” असा कडक इशारा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिला आहे.




