टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी एकनाथ शिंदे आक्रमक; ‘मुंबईत गँगवॉर खपवून घेणार नाही’
मुंबई पोलिसांची १५ पथके तपासासाठी रवाना; कलाकारांनी घाबरू नये, गरज पडल्यास संरक्षण देणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, मुंबई पोलिसांशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत गँगवॉर किंवा गुन्हेगारी टोळ्यांची दहशत खपवून घेतली जाणार नाही. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.
टायगर श्रॉफच्या कारवर जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना घडली. टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर जवळून गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत टायगर श्रॉफ सुरक्षित असल्याचे वृत्त असून, त्याचा चालक आणि एका रिक्षाचालकाला दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चालकाच्या हाताला गोळी लागल्याने त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी १५ पथके तयार केली असून, एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, गोळीबारामागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख याबाबत अधिकृत तपासातून स्पष्टता येणे बाकी आहे.
हेही वाचा – पुण्यातील भाजपच्या १२६ नगरसेवकांचे एक वर्षाचे मानधन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना; दिवाळीपूर्वी मदतीचे लक्ष्य
‘कलाकारांनी घाबरण्याची गरज नाही’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणी त्यांची मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली आहे. टायगर श्रॉफ आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याशीही बोलणे झाल्याचे त्यांनी नमूद केले. कलाकारांनी घाबरण्याची गरज नाही. ज्यांना संरक्षणाची आवश्यकता आहे, त्यांना सुरक्षा पुरवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुंबईत कोणत्याही गुन्हेगारी टोळीची दहशत निर्माण होऊ दिली जाणार नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘९०च्या दशकाप्रमाणे गुन्हेगारीला आळा घालणार’
मुंबई पोलिसांनी १९९०च्या दशकात गँगवॉरचा मुकाबला केला होता. त्याच धर्तीवर आताही गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांची पथके तपास करत असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारामुळे चित्रपटसृष्टीत आणि मुंबईत चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासातून या घटनेमागील कारण, संशयितांची भूमिका आणि इतर संभाव्य संबंध स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.




